दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे मागितली मदत

शनिवार, 8 डिसेंबर 2018 (09:13 IST)
राज्यातील विविध भागात गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे. ही मदत लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे केली. दुष्काळासह राज्यातील विविध विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यात चर्चा झाली.
 
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्याच्या भेटीवर आले असल्याचे सांगून राज्यातील दुष्काळ निवारणासाठी त्वरित मदत उपलब्ध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. राज्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे मिश्रा यांनी सांगितले. राज्याने सादर केलेल्या मदत निधीच्या प्रस्तावाची प्रतही मिश्रा यांना देण्यात आली. 
 
यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली होती. सरकारच्या आठ उपाययोजनेमध्ये टॅंकर, चारा, वीज, विद्यार्थ्यांना शिक्षण, चारा छावण्या यांचा समावेश करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती