राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कधीही आपल्या स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्यास सांगत नाही, मात्र राष्ट्रहितासाठी काम करणार्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला जरुर देते असे सांगतानाच केंद्र सरकारच्या धोरणांवर संघाचा प्रभाव नसल्याचे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
आम्ही कधीही स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्यास सांगत नाही. मात्र, राष्ट्रहितासाठी काम करणार्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला नक्की देतो. आरएसएस राजकारणापासून दूर राहते, मात्र राष्ट्रहितावर त्यांची भूमिका असते, असे भागवत बोलले आहेत.
आम्ही कधीही राज्यघटने विरोधात जाऊन कोणते काम केलेले नाही. असे कोणतेच उदाहरण तुम्हाला सापडणार नाही, असे भागवत यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी आरएसएस सरकारच्या कामकाजात दखल देत असल्याच्या आरोपांवर उत्तर देताना सांगितले की, अनेक लोक अंदाज लावतात की नागपुरातून फोन जातात. मात्र, हे साफ चुकीचे आहे. भागवत यांनी नागपुरातून सरकार चालत नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.
केंद्रात काम करणारे अनेकजण स्वयंसेवक आहेत. प्रधानमंत्री, राष्ट्रपती आरएसएसचे स्वयंसेवक राहिले आहेत. या मुद्द्यांवर अनेकदा चर्चा होत असते. खरेतर हे सगळे माझ्या वयाचे आहेत, मात्र राजकारणात मला सीनिअर आहेत. संघकार्याचा मला जितका अनुभव आहे, त्याहून जास्त त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे. त्यांना राजकीय वाटचालीसाठी कोणत्या सल्ल्याची गरज नाही. आम्ही तो देऊही शकत नाही, असे भागवत यांनी म्हटले आहे. सरकारच्या धोरणांवर संघाचा कोणताही प्रभाव नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.