कांदा उत्पादक शेतकर्‍याकडून मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर

शनिवार, 8 डिसेंबर 2018 (09:09 IST)
संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील कांदा उत्पादक शेतकर्‍याने संगमनेर बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेल्या 51 कांदा गोण्यांचे 2 हजार 916 रुपये झाले. मात्र तोलाई, हमाली व इतर खर्च असे 2 हजार 910 रुपये वजा जाता अवघे 6 रुपये शिल्लक राहिले. त्यामुळे संतप्त श्रेयस आभाळे या शेतकर्‍याने या 6 रुपयांची मनी ऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून निषेध नोंदविला आहे.
 
श्रेयस आभाळे असे शेतकऱ्याचे नाव असून त्याने आपल्या शेतात पिकविलेल्या कांद्यापैकी 51 कांदा गोण्या बाजार समितीमधील गगनगिरी ट्रेडस् या व्यापार्‍याकडे  विक्रीसाठी आणल्या होत्या. त्याची तीन वेगवेगळे वक्कल होते. त्याचे वजन केले असता ते 2 हजार 657 किलो भरले.
 
पहिल्या वक्कलातील 795 किलो कांद्याला प्रति किलोस 2 रुपये 51 पैसे दर मिळाला. दुसर्‍या वक्कालातील 268 किलो कांद्याला प्रति किलोस 75 पैसे दर मिळाला. तिसर्‍या वक्कलाच्या  1 हजार 594 किलो कांद्याला 63 पैसे दर मिळाला. तिन्ही वक्कलची रक्कम 3 हजार 208 रुपये 65 पैसे इतकी झाली. त्यातून हमाली 139 रुपये 90 पैसे, तोलाई 101 रुपये 75 पैसे, वाराई 51 रुपये, तर मोटार भाडे मिळून 2 हजार 910 रुपये पट्टीतून व्यापार्‍याने  वजा  करून घेतले. अखेरीस त्या शेतकर्‍याच्या हातात व्यापार्‍याने अवघी 6 रुपयांची पट्टी दिली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती