पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागांत पावसाचा इशारा

शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (20:54 IST)
राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला असून, 2 ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे.
 
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या सक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. या भागापासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या काही भागांत सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होत आहे.
 
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणखी तीन-चार दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक भागांतच पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2 ऑक्टोबरपासून मात्र या भागातही विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. 

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती