राज्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

बुधवार, 14 जुलै 2021 (09:39 IST)
महाराष्ट्र लवकरच अनलॉक होण्याची शक्यता आहे. याबाबत बाबत टास्क फोर्सने अहवाल सादर केला आहे.  राज्यात पुढील आठवड्यापासून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाऊ शकतात. मात्र, मुंबईत लोकल प्रवास तूर्त सर्वांसाठी खुला होणार नाही.
 
महाराष्ट्र राज्यातील निर्बंधांबाबत सतत सुरू असलेल्या धरसोडीमुळे व्यापारी तसेच नोकरवर्गात असंतोष आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने 'अनलॉक' करण्याची तयारी सुरू आहे. 
 
राज्यातील व्यापारी सततच्या लॉकडाऊनमुळे अस्वस्थ आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक कशा पद्धतीने केले जाईल याचा अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश टास्क फोर्सला दिले होते. टास्क फोर्सने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला आहे. या अहवालावर याच आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने निर्बंध हटविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा वाढण्याची शक्यता आहे. 'अनलॉक'च्या पहिल्या टप्प्यात राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटस् रात्री दहापर्यंत सुरू ठेवावेत, असे टास्क फोर्सने सुचवले आहे. यात रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री १० वाजेपर्यंत वाढवली जाणार असून ५० टक्क्यांची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाणार असल्याचे समजते. यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंटस्मधील सर्व कर्मचार्‍यांच्या लसीकरणाची जबाबदारी मालकांवर सोपविण्यात येईल. लसीकरण झालेल्या ग्राहकांनाच रेस्टॉरंटस्मध्ये प्राधान्याने प्रवेश द्यावा, असे टास्क फोर्सने म्हटले आहे.
 
सरकारी तसेच खासगी कार्यालयांतील उपस्थितीची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्के करण्याची शिफारस केली आहे. तर दुकाने सुरू ठेवण्यासाठी असलेली वेळही वाढवून दिली जाणार असल्याचे समजते. दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे समजते. पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचार्‍यांना दुकाने, कार्यालयांत येण्यास प्राधान्य दिले जावे, असे टास्क फोर्सने म्हटले आहे.
 
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले तरी मुंबई लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता तूर्त तरी नाही. टास्क फोर्स त्यास अनुकूल नाही, असे समजते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती