पेट्रोल पंपांवरील इंधन घोटाळा : मुख्य सूत्रधाराला अटक

गुरूवार, 13 जुलै 2017 (14:22 IST)

पेट्रोल पंपांवरील इंधन घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार प्रशांत नूलकरला ठाणे पोलिसांनी मंगळवारी कर्नाटकमधील हुबळी येथून अटक केली, त्याला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेमुळे अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. इंजिनिअर, फिटर, प्राध्यापक अशा उच्च शिक्षित आरोपींच्या या टोळीने चीन, आफ्रिका, आबुधाबी येथील पेट्रोलपंपांनाही फेरफार केलेल्या सॉफ्टवेअर चीप पुरवल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमधील 98 पेट्रोलपंपांवर केलेल्या कारवाईत 56 पेट्रोलपंपांमध्ये मापात पाप केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 28 पेट्रोलपंपाचा समावेश आहे. 

इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोल पंपावरील मापकात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे सर्वप्रथम उत्तर प्रदेशात उघडकीस आले. या घोटाळ्याचे कनेक्शन ठाणे व डोंबिवलीशी असल्याचे चौकशीतून पुढे येताच एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी डोंबिवलीतील अरमान सेल्स पेट्रोलपंपावर मापकात फेरफार करून पेट्रोलचा घोटाळा करणारा फिजिक्सचा प्राध्यापक विवेक शेट्येला अटक झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी राज्यभरात छापासत्र सुरू केले. यापूर्वी शेट्येला उत्तर प्रदेश पोलिसांनी पेट्रोल चोरीप्रकरणी अटक केली होती.

वेबदुनिया वर वाचा