मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा आपला संकल्प पुन्हा व्यक्त केला. तसेच छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी ही माहिती दिली. शर्मा म्हणाले की, सुकमा येथील नक्षलविरोधी कारवाईत सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. त्यांनी रायपूरमध्ये सांगितले की, आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहे आणि शोध मोहीम अजूनही सुरू आहे. शर्मा यांच्याकडे गृहखातेही आहे. 6 जानेवारी रोजी विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटाचा संदर्भ देत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी केलेल्या कृत्यानंतर सुरक्षा दलांमध्ये प्रचंड संताप आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या या आयईडी स्फोटात आठ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आणि त्यांच्या वाहनाच्या चालकाचाही मृत्यू झाला. तसेच शर्मा म्हणाले, मी सुरक्षा दलांना भेटलो आहे. मी पुन्हा सांगतो की आपल्या सैनिकांच्या ताकदीने आणि धाडसाने नक्षलवादाचा धोका निर्धारित वेळेत संपुष्टात येईल.
तसेच गुरुवारी सकाळी सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक झाली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह, या वर्षी राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या चकमकींमध्ये नऊ नक्षलवादी ठार झाले आहे.