पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तर मी घरी बसायलाही तयार आहे. कारण माझ्यासाठी पक्षादेश सर्वोच्च स्थानी आहे. मी सरकारमध्ये बसणार नव्हतो. पण त्यांनी सांगितलं, तू तिथे जा. म्हणून मी उपमुख्यमंत्री झालो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच त्यांचे मूळ शहर नागपुरात दाखल झाले. भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी येथे त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शहरातून फडणवीसांचा विजयी रॅली काढण्यात आली. या विजयी रॅलीला संबोधित करताना फडणवीसांनी आपली इच्छा नसतानाही वरिष्ठांनी आदेश दिला म्हणून मी उपमुख्यमंत्री झालो, हे पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं. तसेच यावरून मी अजिबात नाराज नाही तर माझ्यासाठी पक्षादेश हा सर्वोच्च आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाविषयी बोलताना म्हणाले, मी ठरवलं होतं. मी सरकार बनविल पण सरकारमध्ये जाणार नाही. तशी घोषणा केली होती. पण राष्ट्रीय अध्यक्षांनी माझं नाव अनाऊन्स केलं. जेपी नड्डा आणि शहा बोलले. मोदींशी बोलल्यावर मी सहभागी झालो. शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. मोदी शहा नसते तर नागपूरचा माणूस कधीच मुख्यमंत्री झाला नसता. त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायला तयार आहे. पण त्यांनी तर माझा सन्मान केला. त्यांनी सांगितलं भाजपच्या संपूर्ण १०६ लोकांचं नेतृत्व तू करतोस. तू सरकारमध्ये जा आणि उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घे.आणि मी जबाबदारी स्वीकारली..