ओढ विठू दर्शनाची, पदस्पर्श दर्शनाची रांग थेट गोपाळपूर येथे उभारलेल्या पत्राशेडमध्ये पोहोचली

मंगळवार, 5 जुलै 2022 (15:15 IST)
दोन वर्ष निर्बंधांमध्ये आषाढी वारी पार पडत होती. यंदा मात्र निर्बंधमुक्त वारी पार पडणार आहे.आषाढी एकादशीला आठवड्याचा अवधी असताना आताच पदस्पर्श दर्शनाची रांग थेट गोपाळपूर येथे उभारलेल्या पत्राशेडमध्ये पोहोचली आहे. पालखी सोहळे पंढरपूर नजीक आल्यावर दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचत असते, यंदा मात्र अजून पालख्या जिल्ह्यात येण्यापूर्वीच भाविकांच्या गर्दीने विक्रम गाठला आहे. त्यामुळे यंदा विक्रमी यात्रा भरणार असल्याचे दिसत आहे.
 
पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनाची रांग मंदिराजवळील सात माजली दर्शन मंडपातून विणे गल्ली माहे चंद्रभागा तीरावरून गोपाळपूर येथे उभारलेल्या १० पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. या पत्राशेडच्या पुढे जवळपास ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्वेरि इंजिनियरिंग कॉलेजपर्यंत बांबूचे शेड बांधून दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. गरज भासल्यास ही लांबी अजून वाढवण्यात येणार आहे. या दर्शन रांगेवर पत्र्याचं आवरण घातल्यानं पावसातही भाविक भिजणार नाहीत.
 
विशेष म्हणजे यात्रेच्या शेवटच्या तीन दिवसांत दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला चहा, नाश्ता भोजन देण्याची व्यवस्था मंदिर समितीनं केली आहे. यासाठी दोन मोठे देणगीदार पुढे आले असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले आहे. सध्या दर्शन रांगेत पन्नास हजारांपेक्षा जास्त भाविक असून आजपासून दर्शनासाठी ८ ते १० तास एवढा कालावधी लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती