पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव, अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणे विजयी
बुधवार, 5 जून 2024 (08:29 IST)
बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात निवडणूक जितकी चुरशीची झाली, तितकीच रस्सीखेच निकालातही दिसून आली. महाराष्ट्रातील सर्वात उशिरा लागलेला निकाल म्हणून बीडची नोंद झाली. शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकेल, हे निश्चित सांगता येत नव्हते, असा हा निकाल ठरला.
अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
बजरंग सोनवणे यांना 6 लाख 81 हजार 585 मतं, तर पंकजा मुंडे यांना 6 लाख 74 हजार 569 मतं मिळाली.
पंकजा मुंडे यांचा 6 हजार 585 मतांनी बजरंग सोनवणेंनी पराभव केला.
बीडमधील मतमोजणी दरम्यान काहीसा गोंधळही पाहायला मिळाला. मात्र, अखेरीस बजरंग सोनवणेंना घोषित करण्यात आलं.
भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना यावेळी लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा सातत्यानं पाहायला मिळाल्या. मुंडे बंधू-भगिणींच्या संघर्षामुळंही हा मतदारसंघ चर्चेत होता.
भाजपच्या प्रीतम मुंडे या ठिकाणच्या विद्यमान खासदार आहेत. पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांना साथ देत धनंजय मुंडेही भाजपबरोबर गेले. त्यामुळं याठिकाणी पंकजांचा विजय सोपा मानला जात होता. मात्र, निकालात चित्र पूर्णपणे फिरलेलं दिसलं.
बीड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
बीड लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे असं म्हणता येईल. कारण 2004 चा अपवाद वगळता गेल्या आठ निवडणुकांमध्ये या ठिकाणी मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे.
पण हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच भाजपचाच गड होता असं मात्र नाही. या मतदारसंघावर 1995 पर्यंत काँग्रेसची पकड असल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या केसरबाई क्षीरसागर इथून तीन वेळा लोकसभेत पोहोचल्या.
त्याचबरोबर 1952 च्या पहिल्या निवडणुकीत पिपल्स डेमोक्रेटिक फ्रंट, 1967, 1977 मध्ये माकप आणि 1989 जनता दलाच्या उमेदवारांना मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.
पण नंतरच्या काळात जयसिंगराव गायकवाड आणि त्यानंतर दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची मुळं या मतदारसंघामध्ये घट्ट केली.
त्यानंतर म्हणजे 1996 पासून तो भाजपचा बालेकिल्ला ठरला. जयसिंगराव गायकवाड, गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत बीडचं प्रतिनिधित्व केलं.
2019 ला काय घडलं?
बीड लोकसभा मतदारसंघावर गोपीनाथ मुंडे यांचं कायम वर्चस्व पाहायला मिळालं. 2009 आणि 2014 मध्ये ते लोकसभेत विजयी झाले. 2014 मध्ये मंत्री बनले.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवत विक्रमी विजय मिळवला.
2019 मध्ये प्रीतम मुंडे यांना भाजपकडून पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. 2014 प्रमाणेच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला आणि पुन्हा एकदा प्रीतम मुंडे विजयी झाल्या.
पण त्यांची मतांची आघाडी खूपच घटल्याचं पाहायला मिळालं. 2014 च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना जवळपास 7 लाखांची आघाडी होती. पण 2019 मध्ये 1 लाख 68 हजारांची आघाडी मिळाली.
2019 मध्ये प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं 90 हजारावर मतं घेतली होती.
धनंजय मुंडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेससाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. त्यामुळं मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळाला होता.
मुंडे वि. मुंडे ते सत्तेत एकत्र
बीड लोकसभा मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी या एकापाठोपाठ आश्चर्याचे धक्के देणाऱ्या होत्या.
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर असलेली सगळीच समीकरणं आता बदलली आहेत.
बीडमधलं राजकारण कायम मुंडे नावाभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळालं आहे. 2019 मध्ये तर मुंडे विरुद्ध मुंडे असा प्रचंड संघर्ष होता.
धनंजय मुंडे आणि पंकजा आमने-सामने होते. त्यात विधानसभेत धनंजय मुंडेंनी पंकजांना पराभूत केलं. त्यामुळं संघर्ष आणखी शिगेला पोहोचला.
पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर पक्षातूनही बाजूला केलं जात असल्याची चर्चा होती. विधान परिषदेवरही संधी मिळाली नाही. त्यांना पक्षानं संघटनात्मक कामात गुंतवलं. पण पंकजा मुंडेंची वक्तव्यं आणि विशेषतः दसरा मेळाव्यातील भूमिका यावरून त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चाही होती.
पक्षांतर्गत विरोधकांबरोबरच धनंजय मुंडेंचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. पण अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर गेल्यानं पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकत्र काम करण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्यात गेल्या काही महिन्यांमध्यं मुंडे भावा बहिणींमधलं नातं सुधारल्याचंही अनेक जाहीर कार्यक्रमांत किंवा खासगी भेटींवरूनही पाहायला मिळालं. त्यामुळं यावेळी धनंजय मुंडे स्वतः बहिणीसाठी प्रचार करताना दिसले.