प्रकाश आंबेडकर : वंचितचा सर्वच्या सर्व जागांवर पराभव, काय आहेत कारणं ?

मंगळवार, 4 जून 2024 (17:53 IST)
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. ‘वंचित बहुजन आघाडी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडेल का?’ अशी भीती काँग्रेससह विरोधी पक्षांना होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यास ही भीती फोल ठरली आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात कुठेही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाहीये. किंबहुना, लढवलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये वंचितचे उमेदवार तिसऱ्या, चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर स्थिरावलेले दिसून येतात. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 35 जागांवर उमेदवार उभे केले होते, तर सात ठिकाणी इतरांना पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिलेल्यांपैकी कोल्हापूर, नागपूर आणि बारामती अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही समावेश होता. वंचितकडे मतदारांना पाठ फिरवण्यामागची कारणं पाहण्यापूर्वी, वंचितच्या उमेदवारांमधील मोठे चेहरे असलेल्या उमेदवारांची स्थिती पाहूया.
 
वंचितचे मोठे चेहरेही निष्प्रभ
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून निवडणूक लढत होते. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी राहिल्याचं दिसून येतं. अकोल्यात खरी लढत काँग्रेसचे अभय पाटील आणि भाजपचे अनुप धोत्रे यांच्यातच झाली. शिर्डीतून उत्कर्षा रूपवते वंचितकडून रणांगणात उतरल्या होत्या. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आधीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भाऊसाहेव वाकचौरे आणि शिवेसनेचे सदाशिव लोखंडे यांच्यातील लढत तिरंगी बनली. शिवसेनेच्या दोन गटातल्या भांडणात वंचितला फायदा होईल, असंही म्हटलं गेलं. मात्र, उत्कर्षा रूपवते या मतदारसंघात उत्कर्षा रूपवते तिसऱ्या क्रमांकवरच राहिल्या. किंबहुना, विजयी आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांच्या तुलनेत रूपवतेंना फारशी मतंही मिळवता आली नाहीत. वंचितच्या उमेदवारांपैकी आणखी एक मोठा चेहरा म्हणजे पुण्यातील उमेदवार वसंत मोरे. भाजपचे मुरळीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या लढतीत मनसेतून आलेल्या वसंत मोरेंना उमेदवारी देऊन वंचितनं पुण्यातील लढत तिरंगी केली खरी, पण निकालात वसंत मोरे तिसऱ्या स्थानापर्यंतच उडी मारू शकल्याचे दिसून आले आहे. पहिल्या क्रमांकावरील मोहोळ आणि दुसऱ्या क्रमांकावरील धंगेकरांच्या तुलनेत वसंत मोरेंनी फारशी मतंही मिळवता आली नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे हे तीन-चार चेहरे वगळता राज्यभरात उभे करण्यात आलेल्या 35 पैकी इतर नावं फारशी चर्चेतली नव्हती. अनेक ठिकाणी तर वंचितच्या 5 ते 10 हजाराच्या मतांचा टप्पाही पार करता आला नाहीय. वंचितनं पाठिंबा दिलेल्या उमेदवारांचं काय झालं, हेही आपण पाहूया. त्यानंतर वंचितला मतदारांनी नाकारण्याची नेमकी कारणं काय, याबाबत चर्चा करू. वंचितनं पाठिंबा दिलेल्या 7 ठिकाणी काय झालं?
वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सात जागांवर उमेदवार न देता, तिथे इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यात काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या एका उमेदवाराचाही समावेश होता
 
वंचितनं पाठिंबा दिलेले उमेदवार आणि त्यांचा निकाल :
कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) - विजयी
बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार) - विजयी
सांगली - विशाल पाटील (अपक्ष) - विजयी
नागपूर - विकास ठाकरे (काँग्रेस) - पराभूत
भिवंडी - निलेश सांबरे (अपक्ष) - पराभूत
अमरावती - आनंदराज आंबेडकर (रिपब्लिक सेना) - पराभूत
यवतमाळ-वाशिम - डॉ. अनिल राठोड (एसजेपी) - पराभूत
याचाच अर्थ, वंचितनं पाठिंबा दिलेल्या सातपैकी तीन जागा विजयी झाल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे हे तीन-चार चेहरे वगळता राज्यभरात उभे करण्यात आलेल्या 35 पैकी इतर नावं फारशी चर्चेतली नव्हती. अनेक ठिकाणी तर वंचितच्या 5 ते 10 हजाराच्या मतांचा टप्पाही पार करता आला नाहीय.
वंचितनं पाठिंबा दिलेल्या उमेदवारांचं काय झालं, हेही आपण पाहूया. त्यानंतर वंचितला मतदारांनी नाकारण्याची नेमकी कारणं काय, याबाबत चर्चा करू.
 
वंचितनं पाठिंबा दिलेल्या 7 ठिकाणी काय झालं?
वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सात जागांवर उमेदवार न देता, तिथे इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यात काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या एका उमेदवाराचाही समावेश होता
 
वंचितनं पाठिंबा दिलेले उमेदवार आणि त्यांचा निकाल :
कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) - विजयी
बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार) - विजयी
सांगली - विशाल पाटील (अपक्ष) - विजयी
नागपूर - विकास ठाकरे (काँग्रेस) - पराभूत
भिवंडी - निलेश सांबरे (अपक्ष) - पराभूत
अमरावती - आनंदराज आंबेडकर (रिपब्लिक सेना) - पराभूत
यवतमाळ-वाशिम - डॉ. अनिल राठोड (एसजेपी) - पराभूत
याचाच अर्थ, वंचितनं पाठिंबा दिलेल्या सातपैकी तीन जागा विजयी झाल्या आहेत.
 
या काळात प्रकाश आंबेडकर हे सर्व पक्षांच्या विरोधात राहिले. मात्र, महाविकास आघाडीसोबत येण्यास उत्सुक असल्याचं सुरुवातीला दिसून आले. मात्र, लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या, तसतशी प्रकाश आंबेडकरांची वक्तव्यं महाविकास आघाडीत येण्यास तितकशी पूरक दिसून आली नाहीत. किंबहुना, वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यात सुसंवादास फूट पाडणारीच वक्तव्य प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून झाली. आणि शेवटी वंचित-महाविकास आघाडी युती यशस्वी झाली नाहीच. परिणामी वंचित स्वबळावर लोकसभेला सामोरं गेली. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लोकसभा लढवत असल्यानं, याचा फटका भाजपविरोधी पक्षांना, म्हणजेच महाविकास आघाडीतल्या पक्षांना बसेल, अशी शंका व्यक्त करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष निकालात तसं काहीही दिसून आलेलं नाही. वंचितनं लढवलेल्या कुठल्याही मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला अशी मतं मिळाली नाहीत, ज्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसेल. असं सगळं असलं, तरी वंचित बहुजन आघाडीच्या इतक्या पिछेहाटीची नेमकी कारणं काय आहेत, हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. यासाठी आम्ही राजकीय विश्लेषकांशीही चर्चा केली.
 
‘वंचित’च्या पराभवाची कारणं काय?
भारतीय जनता पक्षानं ‘400 पार’चा नारा दिल्यानंतर विरोधी पक्षांनी ‘भाजप 400 हून अधिक खासदार संविधान बदलण्यासाठी मागतंय’ असा प्रचार केला. हा प्रचार अनेक ठिकाणी परिणाम करताना दिसला. बीबीसी मराठीचे प्रतिनिधीही महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये निवडणुकीचं वृत्तांकन करण्यासाठी गेले असता, ‘भाजप संविधान बदलू शकते’ ही भीती दिसून आली. ही भीती प्रामुख्यानं अनुसूचित जातीच्या मतदारांमध्ये अधिक प्रकर्षानं होती. यासंदर्भात बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी सविस्तर लेख लिहून, महाराष्ट्रातला ग्राऊंड रिपोर्टही मांडला. दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक हरीश वानखेडे हे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींबाबत अभ्यासपूर्ण लेखन करत असतात. त्यांच्या मते, “भाजपच्या ‘400 पार’च्या घोषणेनंतर काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीने ‘संविधान बचाव’ची मोहीम राष्ट्रव्यापी राबवली. सोबत ‘सामाजिक न्याया’चे मुद्दे आमच्या अजेंड्यावर असल्याचं मतदारांना पटवून दिलं.” भारताच्या संविधानाबाबत अनुसूचित जातींचा समूह संवेदनशील असतो, हे वेगळं सांगायला नको. हे संविधान प्रत्यक्षात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा वाटा होता, एवढ्या एकच कारणानं नव्हे, तर संविधानामुळे आपले न्याय्य-हक्क अबाधित आहेत, ही भावना वंचित घटकांमध्ये रुजलेली आहे. अशावेळी ‘संविधान बचावा’ची मोहीम आपल्या अजेंड्यावर ठेवणाऱ्या काँग्रेस किंवा इंडिया आघाडीसोबत न गेल्याचा फटकाही प्रकाश आंबेडकरांना बसल्याचं दिसून येतंय.
 
एकीकडे काँग्रेस संविधान बचावची मोहीम ठळकपणे राबवत होती आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी त्याच काँग्रेससोबत आघाडी करताना वाद होतील अशी वक्तव्य करत होती. या काळात अनुसूचित जातीच्या मतदारानं लोकसभा निवडणुकीतली आपली भूमिका कायम केली आणि ती आता निकालातून समोर आली. एकीकडे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत गेले नाहीत, दुसरीकडे 2019 साली ज्यांच्यासोबत युती करून अनेक पक्षांना त्यांनी धडकी भरवली होती, त्या एमआयएमसोबतही ते गेले नाहीत. त्याचा परिणाम औरंगाबाद मतदारसंघात तरी दिसून आलाच. तिथे संदिपान भुमरे (शिवसेना), इम्तियाज जलील (एमआयएम), चंद्रकांत खैरे (शिवसेना-उबाठा) आणि अफसर खान (वंचित) अशी चौरंगी लढत झाली. यात भुमरे आणि जलील यांच्यात खरी लढत झाली असली, तरी अफसर खान यांनी 40 हजारच्या वर मतं मिळवली. अनेक मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये एमआयएमचा प्रभाव आहे. तिथे वंचितनेही उमेदवार दिला. त्यामुळे वंचित आणि एमआयएम सोबत न आल्यानं या अंगानंही वंचितला फटका बसला. मात्र, ही झाली निवडणुकीच्या प्रचार आणि आकडेवारीच्या दृष्टीने कारणं. त्याहीपलीकडे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणातही काही कारणं दडली आहेत. केशव वाघमारे याच कारणांवर बोट ठेवतात. केशव वाघमारे यांच्या मते, “अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण अनियमित आहे. निवडणूक ते निवडणूक असं राजकारण करून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी पूर्णवेळ राजकारण आवश्यक असतं. तसंच, संघटनात्मक पातळीवरही वंचित बहुजन आघाडी कमकुवत आहे. केवळ आरोप करून संघटना मजबूत होते नसते. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करावी लागते. ती केलेली दिसून येत नाही.” तसंच, वाघमारेंच्या मते, “दलित मतदारांना गृहित धरून राजकारण करणं अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना या निवडणुकीत फटका देणारं ठरलं आहेच, मात्र यापुढेही ते ठरू शकतं. किंबहुना, आता वंचित बहुजन आघाडी प्रभावी राजकारण करण्याची शक्यताही कमी झालीय.” अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा वाढवू शकतात का, याबाबत बोलताना अनेक अभ्यासक काहीसे साशंक दिसतात. प्रा. वानखेडे म्हणतात की, 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीने त्यांचं बऱ्यापैकी प्रभाव दाखवून दिला होता. आता महाविकास आघाडीसोबत जाऊन, तो प्रभाव आणखी वाढवून कायम करण्याची संधी होती. मात्र ती अ‍ॅड. आंबेडकरांनी दवडली आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावाला आकुंचित करून टाकलंय.
 
प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘आत्मपरीक्षण करू’
दरम्यान, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पराभव स्वीकारताना म्हटलं की, “लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. मी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानू इच्छितो.” पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे, पण आशा सोडलेली नाही, असंही म्हणत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “माझे सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू आणि त्यांचे विश्लेषण करू. आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू.” त्यामुळे आगामी काळात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी कसं काम करते आणि काही महिन्यांवरच येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये कशी कामगिरी करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती