स्वत:च्या पायावर उभं करण्याचं काम आणि राज्यात नवनवे उद्योग आणण्याचं काम आमचं सरकार करणार

मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (08:05 IST)
फॉक्सकॉर्न पाठोपाठ टाटा-एअरबस प्रकल्पासह इतर मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचे समोर आल्यानंतर विरोधक राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहे. या प्रकरणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे. या आरोपांना आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. जे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले म्हणून जे काही आरोप होत आहेत. त्याला जबाबदार कोण आहे, याबाबत मी आता बोलणार नाही. त्याबाबत उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी सविस्तरपणे मत मांडलं आहे. आता मला त्यावर राजकारण करायचं काम करायचं नाही आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
आज प्रसारमाध्यमांशी संवाद करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अगदी विस्तृतपणे भूमिका मांडली आहे. नवीन प्रकल्प आपल्याकडे येत आहेत. मी आणि देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्न करत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार व गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आमचा सातत्याने संपर्क आहे. त्याचबरोबर इतर जे संबंधित विभागांचे मंत्री आहेत त्यांच्याशीही आम्ही राज्याच्या विकासाबाबत सातत्याने संपर्कात असतो. आता पुढच्या काळामध्ये लवकरच मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील. जे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले गेले म्हणून असे जे काही आरोप होत आहेत. त्याला जबाबदार कोण आहे, याबाबत मी आता बोलणार नाही. त्याबाबत उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी सविस्तरपणे मत मांडलं आहे. आता मला त्यावर राजकारण करायचं काम करायचं नाही आहे.  मात्र या राज्याची भरभराट, तरुणांना रोजगार, स्वत:च्या पायावर उभं करण्याचं काम आणि राज्यात नवनवे उद्योग आणण्याचं काम आमचं सरकार करणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती