अन्यथा पुण्यात विक्रम गोखले घराबाहेर सत्याग्रह करणार : लक्ष्मण माने

शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (21:52 IST)
सिनेअभिनेत्री आणि पद्मश्री कंगना रणौतच्या वादग्रस्त विधानानंतर अभिनेते विक्रम गोखले यांनी त्या विधानचे समर्थन केले. यानंतर गायक अवधूत गुप्ते यांनी देखील गोखले अभ्यासपूर्वक बोलतात म्हणत अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. त्या पार्श्वभूमीवर अपुण्यात उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन तिघांच्या विधानाचा निषेध नोंदवला. तसेच येत्या ८ दिवसात या तिघांनी देशातील जनतेची माफी मागावी, अन्यथा पुण्यात विक्रम गोखले घराबाहेर सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
लक्ष्मण माने म्हणाले, “सिनेअभिनेत्री कंगना रणौत हिने पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यानंतर विक्रम गोखले आणि गायक अवधूत गुप्ते यांनी देखील समर्थन केले. त्यामुळे मी तिघांचा निषेध व्यक्त करतो. देशाच्या स्वातंत्र्या लढ्यात जे शहीद झाले त्या सर्वांचा तिघांनी अपमान केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तातडीने कारवाई झाली पाहिजे. याविरोधात आज मी पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.” 
 
“मी आंबेडकरवादी असून मला महात्मा गांधी, सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे विचार पटत नाही. पण त्यांचे देशाच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्यामध्ये योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्यावर कोणीही बोलणार असेल तर मी सहन करणार नाही. जे लोक आज स्वातंत्र्याबद्दल बोलत आहे त्या लोकांचे देशासाठी काय योगदान आहे? या तिघांपैकी एकाने पुढे येऊन या प्रश्नाचं उत्तर द्यावं,” असं आव्हान लक्ष्मण माने यांनी तिघांना दिलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती