राज्यातील शाळा नक्की कोणत्या तारखेपासून सुरू होणार यासंबंधीचा गोंधळ अखेर दूर झाला आहे. उन्हाळी सुट्या देतेवेळी शिक्षण विभागाने आदेश काढून 13 जून पासून शाळा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, शिक्षणमंत्र्यांनी 15 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यामुळे याबाबतीत असलेला संभ्रम अखेर दूर करण्यात आला आहे. यासंदर्भात आज नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे.
राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जूनपासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तर, दि. 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष 23 जून रोजी सुरू होऊन चौथा सोमवार, दि. 27 जून 2022 रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दि. 13 ते 14 जून 2022 रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 प्रादुर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबीच्या अनुषंगाने उद्बोधन करणे याचे नियोजन करण्यात यावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत दि. 24 ते 25 जून 2022 रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येवून दि. 27 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.
शासन, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले तसेच यापुढे देण्यात येणारे निर्देश / सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याचे तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे/ पालकांचे कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने प्रबोधन/ उद्बोधन करण्यात यावे, असे निर्देशही श्री.मांढरे यांनी दिले आहेत.