म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरणी पोलिसांना मयत दोन भावांच्या खिशात दोन वेगवेगळ्या चिठ्ठ्या मिळाल्या असून, त्यात काही जणांची नावे व काही सांकेतिक आकडेवारी असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांनी तपासासाठी दोन्ही चिठ्ठ्या हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, वनमोरे बंधू हे गेल्या काही दिवसांपासून गुप्त धनाच्या मागे लागले होते. यातूनच ते कर्जबाजारी झाल्याची म्हैसाळ गावात चर्चा सुरू आहे. सायंकाळी नऊ जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. मृतांमध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, अर्चना पोपट वनमोरे, शुभम पोपट वनमोरे, माणिक यल्लाप्पा वनमोरे, रेखा माणिक वनमोरे, आदित्य माणिक वन, अनिता माणिक वनमोरे, आणि अक्काताई वनमोरे या नऊ जणांचा समावेश आहे.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आत्महत्या की हत्या याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे. या घटनेने पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे. दोन्ही भावांच्या घरात झाडाझडती करून महत्वाचे पुरावे शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कामी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
दरम्यान, पोलिसाना दोन भावांच्या मृतदेहाजवळ दोन वेगवेगळ्या चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या चिठ्ठ्यामध्ये काही जणांची नावे व त्यापुढे काही संखिकी आकडेवारी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. वनमोरे बंधू हे गेल्या काही दिवसांपासून गुप्त धनाच्या मागे लागले असल्याने ते कर्जबाजारी झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे सापडलेल्या चिठ्ठ्यामध्ये कोणत्या खासगी सावकारांच्या नावांचा समावेश आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने या संपूर्ण तपासाबाबत प्रचंड गोपनीयता बाळगल्याने सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे गूढ कायम आहे. सायंकाळी नऊ जणांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता उत्तरीय तपासणी नंतरच विषबाधा नेमकी कशातून झाली हे स्पष्ट होईल असे सांगण्यात आले आहे.