राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून १६ हजार कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचं किट वाटणार

मंगळवार, 27 जुलै 2021 (12:55 IST)
अतिवृष्टीमुळे राज्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकार लवकरच मदतीची घोषणा करेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील तुफान पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार संवाद साधत आहेत. 
 
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचे जास्त नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती असून कोकणात घरांचं नुकसान झालंय. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. त्यापैकी सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे. राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार मदत करेल. काही तातडीची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी खात्री आहे. या पूर परिस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवारांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. 
 
यावेळी शरद पवरांसोबत पत्रकार परिषदेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे आदी नेते उपस्थित होते. 
 
राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून 16 हजार किट तयार करणार असून यामध्ये घरगुती भांडी, दोन प्लेट, दोन पेले, दोन वाट्या, दोन शिजवायची भांडी, एक तवा, एक चमचा, पोळपाट लाटणे या वस्तूंचा समावेश असेल. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात डॉक्टरांची पथकं पाठवणार असल्याचंही ते म्हणाले. 
 
पूरग्रस्त भागात नेत्यांचे दौरे सुरू असताना पवार यांनी त्यावर भाष्य केले की "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं", असं पवार यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती