नवनीत आणि रवी राणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजद्रोहाचा गुन्हा दाखल
रविवार, 24 एप्रिल 2022 (16:05 IST)
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना वांद्रे वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्यावर 124 A कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं.
राणा दाम्पत्याच्या जामिनासंदर्भात 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत.
या आठवड्यात राणा दाम्पत्य कधीही जामिनासाठी अर्ज करू शकतात. सेशन कोर्टात जामिनासाठी त्यांना अर्ज करता येईल.
राणा दाम्प्त्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वकिलांनी दिली. ही बोगस केस आहे. म्हणूनच सरकारने दुसरा एफआयआर तयार केला असं राणा दाम्पत्याचे वकील अॅडव्होकेट रिझवान यांनी सांगितलं.
सरकारतर्फे अॅडव्होकेट प्रदीप घरत तर राणा दाम्पत्यातर्फे अॅडव्होकेट रिझवान युक्तिवाद केला.
खा.नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहे. 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल असं वर्तन करणं. यासाठी पोलील राणा यांनी केलेली वक्तव्य, भाषणं पाहतील. कोर्टातही हाच युक्तिवाद होईल.
353 कलमाअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल आहे. सरकारी कामात व्यत्यय आणल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होतो.
शनिवारी (23 एप्रिल) खार पोलीस राणा यांच्या निवासस्थानी पोहचल्यानंतर त्यांनी पोलिसांचा विरोध केला. मी गाडीत बसणार नाही अशी भूमिका घेतली. वॉरंट असल्याशिवाय हात लावायचा नाही अशी अनेक वक्तव्य राणा यांनी केली. म्हणून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीला अटक केल्यानंतर 24 तासांत कोर्टात हजर करावं लागतं. आज रविवार असल्याने राणा दम्पत्याला वांद्रे येथील हॉलीडे कोर्टात हजर करण्यात येत आहे. प्रत्येक भागात अशी काही हॉलीडे कोर्ट असतात जी सरकारी सुटी आणि आठवड्याच्या सुटीच्या दिवशी सुरू असतात.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज जामीन मिळणार की पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
काल दुपारी राणा यांनी आपली मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची मोहीम मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी त्यांना खार पोलीस ठाण्यात नेलं आणि त्यांना अटक करण्यात आली.
'उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली आपल्यावर खोटा गुन्हा दाखल होत असल्याचे' सांगत राणा दाम्पत्यानं जामीन नाकारला. त्यामुळे या दोघांना कालची रात्र तुरुंगातच काढावी लागली.
मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर कारवाई झाल्यावर त्या दोघांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभेचे खासदार संजय राऊत, परिवहनमंत्री अनिल परब आणि शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली.
आम्ही फक्त हनुमान चालिसा म्हणायला आलेलो होतो, मात्र आमच्या जीविताला धोका पोहोचेल अशी कृती करण्यात आल्यामुळे या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं राणा दाम्पत्याने म्हटलं आहे. आम्हाला मारहाण केल्यावर रुग्णालय़ात नेण्यासाठी रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली होती, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोक घरासमोर जमले होते.आपल्या जिविताला काही झालं तर हे तिघे जबाबदार असतील असंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
असा घडलं सुटकानाट्य
काल संध्याकाळी साडेपाच वाजता राणा दाम्पत्य त्यांच्या घरातून बाहेर पडले. त्यावेळेसही शिवसैनिकांनी आपली घोषणाबाजी सुरू ठेवली होती. काही मिनिटांच्या चर्चेनंतर नवनीत राणा यांना गाडीत बसवण्यात आले.
यावेळेस अत्यंत नाट्यमय वातावरण तयार झाले असताना राणा दाम्पत्यानेही शिवसैनिकांच्या दिशेने पाहून काही उद्गार काढले. यावेळेस त्या अत्यंत संतापलेल्या दिसत होत्या. अखेर प्रचंड घोषणाबाजीमध्ये दोघांनाही दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून परिसरातून बाहेर काढण्यात आलं.
खार पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा
राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावरही दोन्ही राणा यांनी आपली आक्रमक भूमिका दाखवली. यावेळेस त्यांनी अत्यंत संतप्त होत सरकारचा निषेधही केला. राणा दाम्पत्य खार पोलीस ठाण्यात गेल्यावरही वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली खारमध्ये घोषणा देत राहिले.
राणा दाम्पत्याला पोलीस ठाण्यात नेल्यावर भाजपाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली. सरकारने पोलिसांच्या बळाचा गैरवापर केल्याचं मत या दोघांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
'हे एखाद्या जुलमी राजवटीनुसार सुरू आहे, पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेण्याची काहीच गरज नव्हती. सरकार लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी करतेय. राणांना कोणतंही कारण नसताना अटक केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्यं केली आहेत त्यांना पण अटक करणार का? एवढा अहंकार महाराष्ट्रातल्या लोकांनी कधीच पाहिला नाही.', असं दरेकर यावेळेस म्हणाले.
काल दुपारी काय काय झालं?
राणा यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्यावरही शिवसैनिकांनी राणा यांच्या खार निवासस्थानाजवळची गर्दी कमी केली नाही. जोपर्यंत राणा दाम्पत्य माफी घेत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली. राणा यांना घरातून बाहेर काढण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि अधिकारी या परिसरात दाखल झाले होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना गर्दी कमी करण्याची विनंतीही केली. महिला शिवसैनिकांना रोखण्यासाठी आणि राणा यांना घराबाहेर जाण्या वाट करुन देण्यासाठी महिला पोलिसांचीही मोठी कुमक या परिसरात दाखल झाली होती.
युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांना शांत राहून कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं. पोलीस राणा दाम्पत्याला पोलीस चौकीत घेऊन जाणार आहेत, त्यावेळेस कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये अशी विनंती त्यांनी शिवसैनिकांना केली.
वॉरंटशिवाय पोलीस चौकीत येणार नाही- राणा दाम्पत्य
पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस चौकीत येण्याची विनंती केल्यावर राणा दाम्पत्याने त्याला ठाम विरोध केला. वॉरंटशिवाय आम्ही कुठेही येणार नाही असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. संजय राऊत, अनिल परब यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे असं वक्तव्य रवी राणा यांनी सांगितलं. आमच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, आमच्यावर मात्र गुन्हा कसा दाखल होतो असा प्रश्न नवनीत राणा यांनी विचारला.
आम्ही दोघांनी घराबाहेर न पडून कालपासून पोलिसांना सहकार्य केलं आहे, आम्ही पोलीस ठाण्यात येणार नाही असं नवनीत राणा यांनी निक्षून सांगितलं.
त्यानंतर राणा यांनी एका व्हीडिओ संदेशातून आपली बाजू मांडली. आमच्या घरात पोलीस घुसले आहेत. कालपासून आम्ही नोटीशीनुसार घराबाहेर पाऊल ठेवलेलं नाही. मात्र आता पोलीस घरात घुसले आहेत. आम्हाला अशा पद्धतीने पोलिसात नेण्याचा प्रयत्न होतोय, अशी गुंडशाही कधीही पाहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यासारखे नेते असतानाही आमच्यावर अशी वेळ येतेय. मी त्यांच्याकडे मदतीसाठी विनंती करते" असं त्या व्हीडिओ संदेशात म्हणाल्या.
आंदोलन मागे घेताना राणा काय म्हणाले?
रवी राणा यावेळेस म्हणाले, "शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतली कायदा सुव्यवस्था बिघडवली, हनुमानचालिसेला त्यांचा एवढा विरोध का आहे? उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे. या दौऱ्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये. कोणत्याही धमकीला घाबरायचं कारण नाही, आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. आम्ही लोकांची सेवा करुन विधानसभा, लोकसभेत पोहोचलो आहोत. आम्ही आता हे आंदोलन मागे घेत आहोत."
हनुमान चालिसेला विरोध करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असंही रवी राणा यावेळेस म्हणाले.
नवनीत राणा यांनी यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली. त्या म्हणाल्या, "आताच्या शिवसेनेत गुंड आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून दिले आहेत. त्यांनी गुंडांची मीटिंग घेऊन सकाळी सातपासून इथे घरापर्यंत जमायला सांगितले. आम्ही घाबरणारे नाही. घाबरत असतो तो अमरावतीमधून इथपर्यंत आलो नसतो. मुख्यमंत्री नवनीत-रवी राणा यांच्यावर आपले गुंड कधी हल्ला करतील याची वाट पाहात बसले. शिवसैनिकांनी हनुमानचालिसा आणि रामाचा अपमान केला आहे. त्यांनी हिंदुत्व सोडले आहे."
राणा यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरही टीका केली. "पोलिसांनी केलेलं बॅरिकेड हे लोक तोडू शकतात तर पोलिसांची ताकद कमी पडतेय की शिवसैनिकांची ताकद जास्त आहे?" अशा शब्दांत त्यांनी वळसे पाटील यांच्यावर टीका केली.
संजय राऊत, अनिल परब यांची राणा दाम्पत्यावर टीका
संजय राऊत यांनी नवनीत आणि रवी राण यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन पुन्हा टीका केली. दोन्ही राणांचा उल्लेख त्यांनी घंटाधारी हिंदुत्ववादी असा केला. तसेच राणा यांना पुन्हा अमरावतीचे बंटी और बबली अशी संभावना केली.
ते म्हणाले, "पंतप्रधानांचा दौऱ्याच्या सबबीखाली त्यांनी पळ काढला आहे. भंपक बोगस लोकांवर भाजपाने बंदुक ठेवून शिवसेनेवर हल्ला करायचा प्रयत्न करत होते. काल आणि आज त्यांनी मातोश्रीवर घुसून काही वेगळं करायचं कारस्थान रचलं होतं. हनुमान चालिसा त्यांना घरातही वाचता आली असती. मंदिरातही जाता आलं असतं. गोंधळ अराजक करण्याचं कारस्थान कोणाचं होतं? या बंटी-बबलीला हिंदुत्व शब्द म्हणायला लाज वाटत होती आज ते हिंदुत्व, हनुमान चालीसाची भाषा करत आहेत. आम्ही घंटाधारी हिंदू नसून आम्ही गदाधारी आहोत. आंम्हाला हिंदुत्व शिकवण्याचा अतिशहाणपणा कोणी करु नये. कृपा करुन आमच्या वाट्याला जाऊ नका, 20 फूट खाली गाडले जाल हे मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय, शिवसैनिकांची परीक्षा पाहू नका. तुमच्या विषाला फुटलेल्या उकळीला दाबायची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा कालपासून मुंबईत दाखल झाले आहेत. आज 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार असं त्यांनी जाहीर केलं होतं.
पण, त्यांच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर जमले. काही शिवसैनिक तर बॅरिकेड तोडून राणांच्या घरातही घुसल्याचं पाहायला मिळालं.
मंत्री अनिल परब यांनीही राणा यांच्यावर टीका केली. पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले, " राणा दाम्पत्य जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत शिवसैनिक माघार घेणार नाहीत. राणांविरोधात आम्ही पोलिसांत गुन्हा दाखल करत आहोत. त्यांनी शिवसेनेला मुद्दाम डिवचायचा प्रयत्न केला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांनी वारंवार प्रक्षोभक वक्तव्यं केली आहेत. "
राणा यांना बाहेर काढायलामी स्वतः जाईन- नारायण राणे
या गदारोळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रवेश केला. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली.
ते म्हणाले, " मातोश्रीवर हजारो शिवसैनिक वगैरे दाखल झालेले नाहीत. तेथे 235 शिवसैनिक आहेत. हे काय राज्य चालवणं आहे का? जनतेला अन्न वस्त्र निवारा देण्याऐवजी हे काय देत आहात? पोलिसांनी हस्तक्षेप करुन राणा यांना जाऊ द्यावं. जर त्यांना जाऊ दिलं नाही तर मी तेथे जाऊन राणा यांना बाहेर काढणार. मी स्वतः जाऊन त्यांना मदत करेन. शिवसेना मजबूत होईपर्यंत संजय़ राऊत पक्षात नव्हते. ते नंतर आलेत. ते काहीही बोलले तरी त्यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही. आमच्यावर लगेच गुन्हा दाखल होतो."
नारायण राणे पुढे म्हणाले, हे कसलं सरकार आहे? राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी आम्ही हे करत नाहीत. योग्य वेळेस केंद्र सरकार सगळं काही करेल. जेवढं बोलायचं तेवढं बोला. संजय राऊत यांना मी बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन खासदार केलं. त्यांच्या निवडणुकीच्यावेळेस पहिल्यांदा फॉर्म भरताना त्यांचं निवडणूक यादीत नावही नव्हतं. त्यांना मी सांभाळून घेतलं होतं."
काल 22 एप्रिलच्या रात्रीपासून शिवसैनिक राणा यांच्या घरावर पहारा ठेवून होते. त्यात मुंबईचे आणि मुंबईबाहेरचे शिवसैनिकही होते. नऊ वाजता गर्दी वाढली आणि त्यावेळी शिवसैनिक बॅरिकेड तोडून राणांच्या घरात घुसले.
पोलिसांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची संख्या कमी पडली. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना तिथून जायला सांगितलं तरीही ते तिथेच बसून आहेत.
शिवसैनिकांच्या या वर्तनावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "एक आमदार आणि खासदाराला घरी बंद करण्याचं कारण काय? त्यांना घरी येण्यापर्यंत ताकद कोणी दिली, गृहमंत्री त्यांच्या लोकांचा गैरवापर करत आहेत."
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही नवनीत राणा यांच्या आक्षेपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, "मुंबई आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित आहे. पण, काही लोक ही व्यवस्था बिघडली आहे, असं दाखवण्यासाठी वेगवगेळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.
"नवनीत राणांच्या कोणत्याही प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मी वेगळा आदेश देत नाही. पोलीस पातळीवर निर्णय घेतले जातात.
"ज्यांना हनुमान चालिसा वाचायची त्यांनी अमरावतीला किंवा आपापल्या घरी वाचावी. त्यासाठी असे प्रकार करण्याची काय गरज? राणा दाम्पत्य हटण्यासाठी तयारच नसेल तर कायदा आपलं काम करेल."
तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे वागा- संजय राऊत
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, "कुणाच्या तरी पाठबळाने जर तुम्ही आमच्या मातोश्रीमध्ये जबरदस्ती येणार असाल, तर आम्ही काय स्वस्थ बसणार का. तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे वागा अन्यथा शिवसैनिकांना देखील तुमच्या घरावर हल्ला करण्याचा अधिकार आहे."
"हा केवळ शिवसेनेचाच उद्रेक नाही तर सामान्य जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. केंद्रीय सुरक्षा दलाचा वापर करुन जर शिवसेनेवर हल्ला करणार असाल तर आम्ही शिवसैनिक मरायला आणि मारायला मागे पाहणार नाही. तुम्ही जर आमच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही. हे सर्व करून जर राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर खुशाल लावा आम्हाला काही परवा नाही," असंही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - भाजपची टीका
मोहित कंभोज यांच्यावरील हल्ला आणि नवनीत राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांच्या घोषणेबाजीविषयी बोलताना भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
आज दुपारी पत्रकार परिषदेत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, "नवनीत राणांना हनुमान चालिसेचं पठण करायचं होतं. एवढाच विषय होता. त्यांच्या घरापर्यंत शिवसैनिकांना जाण्याला मुभा दिली. राज्यात पोलिसांच्या डोळ्यादेखत सत्ताधारी पक्षाची गुंडगिरी सुरू आहे. सरकार पुरस्कृत दहशत आणि गुंडगिरी सुरू आहे. यात महाविकास आघाडीचं सरकार आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे."
"भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. पण, आम्ही कायद्याला मानणारे आहोत. म्हणून लोकशाही मार्गानं जे करता येईल, ते करण्याला आमचा पहिला प्रयत्न असणार आहे," असंही ते म्हणाले.
बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांचं विश्लेषण
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध भाजप नाट्याचे दशावतार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधी भाजपच्या जवळ जाऊ पाहणाऱ्या राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा काढला. नंतर त्यांची री ओढत भाजपचे सहयोगी असलेल्या राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा घाट घातला.
राणा दाम्पत्य जरी चेहरा असले तरी कंबोज-दरेकरांसारखे भाजपचे नेते त्यांना पाठिंबा देत आहेत. यामागे विरोधकांचे दोन डावपेच दिसतात: एक, शिवसेना ही हिंदुत्ववादी पार्टी उरली नाही; त्यांचे नेते साधे हनुमानाचं नावही घेत नाहीत, असं ठसवण्याचा प्रयत्न करणे. दोन, कंबोज-राणांवर सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते हल्ला करू धजतात, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असं दाखवणे.
शिवसेनेसाठी ही परिस्थिती अडचणीची आहे, हे खरे. सत्तेत असल्यामुळे आणि 'सेक्युलर' पक्षांसोबत सत्तेत असल्यामुळे उद्धव ठाकरेंचे हात बांधलेले आहेत. पण या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांनी मातोश्रीसमोर शिवसैनिकांची जमावजमव केली. शिवसेनेच्या किशोरीताईंनी शंख फुंकला आणि मरगळ आलेल्या शिवसेनेत नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंवर कुणीच 'चाल करून येतंय' आणि त्यासाठी सैनिकांनी युद्धासाठी सज्ज व्हावं, असं वातावरण तयार केलं.
पाणीटंचाई, भारनियमन यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांकडे या निमित्ताने माध्यमांचं दुर्लक्ष होतंय, हेही महाविकास आघाडी सरकारच्या पथ्यावर पडतंय.
गेल्या दोन आठवड्यांपासून सगळ्या मराठी न्यूज चॅनल्सवर जास्तीत जास्त वेळ राज ठाकरे आणि मनसैनिक दिसत होते. आज सकाळपासून राणांच्या कृपेमुळे 'आवाज कुणाचा - शिवसेनेचा' अशा घोषणा दुमदुमत आहेत. त्यामुळे भाजपनेही लगेच पत्रकार परिषद घेऊन या दिवसभराच्या धावत्या कव्हरेजमध्ये स्वतःचं अस्तित्व भासवलं.