नाशिक :काही दिवसापूर्वी तेजीत असलेले टोमॅटो दर आता आवक वाढल्याने भाव खाली आले आहेत. अडीच हजार रुपयांना विक्री झालेली क्रेट आता सरासरी पाचशे रुपयांना विकावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. याआधी जुलै महिन्यात टोमॅटोचे भाव अडीच हजार रुपये क्रेटपर्यंत पोहोचले होते. आधी टप्प्याटप्प्याने आवक वाढत गेले तसे दर घसरत चालले आहेत. बेंगळुरूमध्ये स्थानिक टोमॅटो बाजारात दाखल झाल्याने महाराष्ट्राकडून मागणी कमी झाली आहे.
एका दिवसात साधारणत: टोमॅटोची आवक 40 हजार क्रेट दरम्यान होते. त्याला प्रतिक्रेट 500 ते 550 रुपये दर मिळाला. हाच दर कायम राहिला तरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरुन निघेल. यापेक्षा कमी झाले तर मात्र आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
दोन आठवड्यांपूर्वी पिंपळगाव बसवंत बाजार समितीत अवघी अडीच हजार क्रेट आवक होती. त्यावेळी प्रति क्रेट कमीत कमी 200 व जास्तीत जास्त 2300 रुपये दर होता. आता दिवसाला 40 हजार क्रेटपर्यंत आवक होते. तसेच जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही टोमॅटोची आवक वाढल्याने दरात प्रत्येक दिवशी घसरण होताना दिसून येते.