नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथे महिलेने पिशवीतील डब्ब्याने प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेतातील काम उरकून ही महिला घरी जात असतांना बिबट्याने हा हल्ला केला. त्यावेळेस महिलने प्रसंगावधान राखत आपल्या सोबत असलेल्या जेवणाच्या डब्याच्या पिशवीने प्रतिकार करत स्वत:चा बचाव केला. या घटनेत महिलेच्या हाताला आणि मानेला बिबट्याचे पंजे लागल्याने त्या जखमी झाल्या.
संगीता लक्ष्मण काळे असे या धाडसी शेतकरी महिलेचे नाव आहे. शेतीचे काम संपल्यानंतर त्यांनी जेवण केले. त्यानंतर त्या घरी जात असतांना लक्ष्मण त्र्यंबक काळे यांच्या शेतातील राहत्या घराजवळ त्या आल्या. येथे उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक हल्ला झाल्याने संगीता या घाबरल्या. पण, प्रसंगावधान राखत त्यांनी आपल्या हातात असलेली विळा-खुरपे आणि जेवणाच्या डब्याची कापडाची पिशवी फिरवत बचाव करण्याचा प्रयत्न केला. यामुळे बिबट्याच्या जबड्यात पिशवी अडकली. त्यानंतर बिबट्याला ढकलत संगिता काळे यांनी आरडाओरड केली. त्याचवेळी रस्त्याने जाणारे सुदाम कमोद यांनी मदतीसाठी धाव घेतली. कमोद यांना बघून बिबट्याने शेजारील उसाच्या शेतात धुम ठोकली.
बिबट्या पळाला पण, या झटापटील संगिता काळे यांच्या हाताला, मानेला बिबट्याने खरचटल्याने त्यांना जखमा झाल्या. या घटनेनंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी नायगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.