नाशिकमधील अंबड चुंचाळे परिसरातील म्हाडा कॉलनी येथे राहत्या घरात भावासोबत झोका खेळत असतांना एका दहा वर्षाच्या चिमुकल्याचा झोक्याचा गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निखिल निंबा सैंदाणे (वय १०) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मृत निखिल याचे वडील कंपनीमध्ये कामाला गेले होते तर आई काही कामासाठीशेजारी गेली होती. अशावेळी निखिल आणि त्याचा लहान भाऊ घरात एकटेच झोका खेळत होते. यावेळी धाकट्या भावाचा झोका खेळून झाल्यावर मोठ्या भावाने (निखिल) झोका खेळायला सुरुवात केली. यावेळी त्याने उंच झोका घेण्याचा प्रयत्न केला असता झोक्याची दोरी तुटून त्याच्या गळ्याला फास लागला आणि तो खाली पडला.
यावेळी निखिल काहीच बोलत नसल्याने त्याच्या लहान भावाने आईकडे धाव घेऊन तिला घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर त्याच्या आईने घराकडे धाव घेतली असता निखिल निपचित जमिनीवर पडलेला दिसला. यानंतर तिने तात्काळ दोरी कापून निखिलला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्याने काहीच हालचाल केली नाही. त्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी तात्काळ निखिलला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी निखिल यास तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निखिल याच्या पश्चात आई-वडील आणि सात वर्षाचा लहान भाऊ आहे.