नाशिक : शिक्षक आमदारच पुण्याच्या शिक्षण आयुक्तालयासमोर आमरण उपोषण

शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (20:21 IST)
राज्यातील अनुदानित तसेच टप्पा अनुदानित शिक्षकांचे प्रश्न सातत्याने मागणी करूनही सुटत नाही.यामुळे शिक्षक बांधव मेटाकुटीला आले असून शिक्षकांच्या या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी या मागणीसाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे सहकाऱ्यांसमवेत पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालय पुढे १७ ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार आहेत.
 
यापूर्वी शिक्षण विभागाकडे तसेच शिक्षण मंत्र्यांकडे देखील सातत्याने पाठपुरावा करूनही काही प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही.किंबहुना अधिकाऱ्यांकडे देखील सातत्याने मागणी करूनही शिक्षकांच्या रखडलेल्या प्रमुख समस्यांची दखल होत नसल्याने माजी आमदार दत्तात्रय सावंत,बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे यांच्यासह आयुक्तांच्या कार्यालयासमोर प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत उपोषण करणार असल्याचे आमदार दराडे यांनी सांगितले.
 
डिसेंबर २२ मध्ये ११६० कोटी रुपये विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांसाठी तरतूद करून दिलेली आहे.तसा शासन आदेश ६ फेब्रुवारी २०२३ ला काढला आहे. परंतु नव्याने अनुदानावर आलेल्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक मधील शिक्षक, शिक्षकेतर बांधवांना शालार्थ आयडी अद्याप मिळाला नसल्याने त्यांचा जीव हेलपाटे घालून मेटाकुटीला आला आहे.अनुदान मंजूर होऊन हि संबंधित शाळा व शिक्षकांना शालार्थ आयडी मिळणेसाठी उपसंचालक कार्यालयाकडे व बोर्डाकडे हेलपाटे मारून जीव मेटाकुटीला आले आहेत.
 
सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत काळे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी आंदोलन केले जात आहे. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे सर्व नवनियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व स्तरावरील शालार्थ आयडी प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत,शिक्षकांची अनेक वर्षापासून रखडलेली फरक बिले द्यावीत,कनिष्ठ महाविद्यालयांची वाढीव पदांची माहिती शासनाला तत्काळ पाठविणे,नाशिक विभागातील जळगाव,अहमदनगर व नाशिक जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत होण्याचा शासन निर्णय निर्गमित करावा,नाशिक विभागातील २०,४० व ६० टक्क्यांवर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेला होण्यासाठी निधीची तरतूद व्हावी, मुख्याध्यापक व महिला शिक्षकांना बीएलओ कामातून वागळावे आदी मानण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे. या प्रश्नांची ठोस सोडवणूक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही आमदार दराडे यांनी दिला आहे. राज्यातील शिक्षक बांधवांनी देखील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती