महाराष्ट्र प्रीमिअर लीग मध्ये नाशिकच्या सत्यजित, मुर्तुझा, यासर, शर्विन व साहिलची निवड

बुधवार, 7 जून 2023 (21:14 IST)
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेसाठी नाशिकच्या सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला, यासर शेख, शर्विन किसवे, साहिल पारख या खेळाडूंची विविध संघांत एमपीएलच्या लिलावात निवड झाली आहे.
 
आयपीएलच्या धर्तीवर झालेल्या लिलावावेळी सहा संघांची नावेही जाहीर करण्यात आली. सुहाना मसालेवालेंचा पुणे संघ पुणेरी बाप्पा नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल. पुनित बाल समुहाचा संघ कोल्हापूर टस्कर्स, ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ ईगल नाशिक टायटन्स, वेंकटेश्‍वरा इंडस्ट्रिजचा संघ छत्रपती संभाजी किंग्ज, जेटस सिंथेसिसचा संघ रत्नागिरी जेटस, कपिल सन्सचा संघ सोलापूर रॉयल्स अशा नावाने ओळखला जाईल.
 
सोलापूर रॉयल्सने सत्यजित बच्छावला 3 लाख 60 हजार रुपयांना खरेदी केले. तर मुर्तुझा ट्रंकवालाला छत्रपती संभाजी किंग्जने 1 लाख 80 हजार रुपयांना, ईगल नाशिक टायटन्सने साहिल पारखला 60,000 मध्ये, ईगल नाशिक टायटन्सनेच शर्विन किसवेला तर यासर शेखलाही सोलापूर रॉयल्सने खरेदी केले आहे.
 
एमपीएल स्पर्धेचे सामने वरील 6 संघांत 15 जून ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहेत.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती