जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे शहाजी उमाप यांनी हाती घेतल्यानंतर पुन्हा ग्रामीण दल आता नव्या उर्जेने जिल्हा अवैध धंद्यापासून (Illegal business) मुक्त करण्याच्या कामगिरीसाठी लागले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकांमार्फत (Special Squads of Local Crime Branch) धडाकेबाज कारवाई करून दिंडोरी , सुरगाणा कारवाईत सुमारे 1 कोटी 22 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांच्या या विशेष कामगिरीचे कौतुक होत असून जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याची पोलिसांनी कंबर कसली आहे.
दिंडोरीत डिझेलसदृश्य पदार्थाची भेसळ
दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील जानोरी परिसरात फ्रेशस्ट्रॉप कपंनीनजीक असलेल्या शेडमध्ये काही संशयित डिझेल सारखे दिसणारे ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थ भेसळ करीत असल्याचा सुगावा लागला. पोलिसांनी सापळा रचत घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांच्या हाती अनिलभाई भवानभाई राधडीया, दिपक सुर्यभान गुंजाळ, इलियास रज्जाक चौधरी, अबरार अली शेख, अझहर इब्रारहुसेन अहमद असे संशयित लागले.
पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेतले असून या छाप्यात 2 टॅंकर, प्लॅस्टिक टाक्या, त्यातील बायोडिझेल सारखे दिसणारे ज्वलनषील पदार्थ व साहित्य साधने असा एकूण 1 कोटी 01 लाख 68 हजार 240 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आणखी तपास करत आहेत.
पोलिसांनी दुसरी धडक कारवाई सुरगाणा पोलीस ठाणे हद्दीत केली असून पोलिसांनी मोठा दरोड्याचा कट उधळून लावला आहे. पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मोतीबाग परिसरात काही संशयित दोन चारचाकी वाहनांमध्ये संशयास्पद हालचाली करताय असे आढळून आले.
पोलिसांना याबद्दल कल्पना येताच त्यांनी गणेश रामभाऊ जगताप, दिपक किसन जोरवेकर, सिताराम उर्फ प्रमोद सोमनाथ कोल्हे, प्रशांत शशिकांत आहिरे, सोमनाथ संजय भोये, गोविंद लक्ष्मण महाले या संशयिताना ताब्यात घेतले. यांची व वाहनाची झडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक गोष्टी मिळून आल्या. यात 1 देशी बनावटीचे पिस्तूल, 01 जिवंत काडतूस, लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी रॉड, लाकडी दांडे, मिरचीची पुड असे दरोडा टाकण्याचे साहित्य तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली 1 टाटा नेक्सॉन व 1 महिंद्रा बोलेरो जीप हे सर्व मिळून आले. हे सर्व जप्त करण्यात आले आहे.
तसेच आणखी धडक कारवाया करत नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत 21 संशयितांविरुद्ध एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1कोटी 22 लाख 78 हजार 395 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आगामी काळात ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.