नाशिक :बिल्डर पारख अपहरण; आरोपींना पाक सीमेवर अटक राजस्थानी टोळीस अटक; एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (20:40 IST)
नाशिक : शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणी नाशिक पोलिसांनी राजस्थानमध्ये भारत-पाक सीमावर्ती भागात एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंदिरानगर परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांची अपहरण झाल्याची तक्रार 2 सप्टेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती त्यानंतर या तपासाला गती देत स्वतः पोलीस आयुक्तांनी याबाबत मार्गदर्शन करीत या टोळीचा छडा लावला आहे.
याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले, की भारत-पाक सीमेवर असलेल्या गावांमध्ये जाऊन नाशिक पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे तपास करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कार्य हे कौतुकास पात्र असल्याचे सांगून आयुक्त शिंदे म्हणाले, की या सर्व प्रकरणांमध्ये नाशिक पोलिसांनी वाडीवऱ्हेजवळ असलेला बिकानेर ढाबा चालविणारा महेंद्र ऊर्फ रामनारायण बिष्णोई, तसेच पिंटू राजपूत, रामचंद्र ओमप्रकाश बिष्णोई आणि कामगार अनिल खराटे (रा. वाडीवऱ्हे) याला अटक करण्यात आली आहे.
दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, तसेच तपासात या गुन्ह्याचा मास्टर माईन्ड हा नाशिक शहरातील अनिल भोरु खराटे (वय 25, रा. लहानगेवाडी, पो. वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी) हा असून, त्याने या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेंद्र बिष्णोई व त्याचे साथीदार यांच्या मदतीने या गुन्ह्याचा कट रचल्याचे व हेमंत पारख यांच्याबाबत इत्थंभूत माहिती पुरविली होती, असे निष्पन्न झाल्याने त्यालाही दि. 10 सप्टेबर रोजी अटक करण्यात आली आहे.
हा गुन्हा गंभीर व क्लिष्ट असल्याने पोलीस आयुक्त शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्याकडे दिला. वपोनि विजय ढमाळ यांनी, सपोनि सूर्यवंशी, सहा. पोउपनि रवींद्र बागूल, हवालदार नाजीम पठाण, पोलीस नाईक विशाल काटे, विशाल देवरे, विशाल मरकड, राहुल पालखेडे, योगेश चव्हाण या तपास पथकासह राजस्थानातील फलोदी जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेलगत वाळवंटी भागातील निर्मनुष्य वस्तीत जाऊन अटक केली, तसेच यावेळी आरोपींकडून खंडणीपैकी 1 कोटी, 33 लाख रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो कॅप्मर गाडी, देशी बनावटीचा कट्टा, सहा जिवंत राउंड असा 8 लाख 32 हजार 500 रुपये असा एकूण 1,41,32,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आणखी तिघे वॉण्टेड
या गुन्ह्यात चारही आरोपींना दि. 8 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून, त्यांना दि. 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यांत आली आहे. या गुन्हयात मुख्य आरोपींसह अपहरण कटामध्ये आणखी तीन आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचा तपास चालू आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे, प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, रणजीत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू उगले, रविंद्र बागुल, नाजिम पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, तसेच गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोउपनि सुगन साबरे, हवालदार येसाजी महाले, पोलीस कर्मचारी शरद सोनवणे, प्रदीप म्हसदे, मुख्तार शेख, आप्पा पानवळ, राहूल पालखेडे, महेश साळूंके, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे , किरण शिरसाठ आदींनी ही कामगिरी यशस्वी केली आहे.