नाशिकच्या गणेश मंडळांना महापालिकेकडून मंडप शुल्कात दिलासा; इतक्या रुपयांचे शुल्क माफ

बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (07:52 IST)
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून गणेश मंडळाची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच नाशिकमधील हजारो मंडळांना मनपाने दिलासा दिला आहे. गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना शुल्क माफी देण्याचा प्रस्ताव अखेर नाशिक महापालिकेच्या महासभेत मंजूर झाला असून तसे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर जारी केले आहेत. मात्र वाणिज्य स्वरूपाच्या जाहिराती घेतील, त्यांना जाहिरात शुल्क भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 
काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले असून गणेश मंडळांकडून देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान गणेश मंडळांना महापालिकेकडून मंडप शुल्कात दिलासा मिळाला आहे. गणेश मंडळांना पालिकेकडून आकारला जाणारा मंडप शुल्क आणि जाहिरात कमान शुल्क माफ केला आहे.
 
यामुळे शहरातील असा बाराशेहुन अधिक मंडळांना दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात महानगरपालिकेच्या जागेवर मंडप, व्यासपीठ आणि कमानीसाठी 750 रुपयांचे शुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र गणेशोत्सवात वाणिज्य जाहिराती प्रसिद्ध केल्यास मंडळांना जाहिरातीच्या आकारमानानुसार परवाना शुल्क आणि जाहिरात कर भरावा लागणार आहे.
 
नाशिक महापालिकेची महासभा आणि स्थायी समितीची सभा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित बैठकीत आरास मंडप व्यासपीठाच्या परवानगीसाठी लागणारी शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी गणेश मंडळांनी केली होती. त्या अनुषंगाने हा विषय महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता. मंडळांना मंडप व्यासपीठ व कमानीच्या परवानग्यासाठी आता 750 रुपये शुल्क द्यावे लागणार नाही, परंतु संबंधित मंडळांनी वाणिज्य जाहिराती प्रसिद्ध केल्यास जाहिरातीच्या आकारमानानुसार परवाना शुल्क व जाहिरात कर द्यावा लागणार असल्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी म्हटले आहे.
 
हा आदेश गणेशोत्सव 2023 करता लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मंडप शुल्काच्या प्रश्न मिटल्याने वीज मिटर घेण्याचा प्रश्न देखील सुटण्यास मदत मदत होणार असून पालिकेच्या या निर्णयाचे गणेश मंडळांनी उत्साहात स्वागत केले आहे.
 
बाराशे गणेश मंडळांना दिलासा
गणेश मंडळे देखावे उभारण्यासाठी जे मंडप बांधतात, त्यासाठी नाशिक महापालिका दरवर्षी मंडप शुल्क आकारते. ते जास्तीत जास्त साडे सातशे इतके होते. मात्र, ते माफ करण्यात आल्याने मंडळांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
 
दरवर्षी गणेशोत्सवात मंडप शुल्क माफ करण्याची मागणी हेात असते. अनेकदा मुंबई, पुणे सारख्या शहरात मंडळाची गर्दीही खूपच असते, त्यामुळे त्यांचे शुल्क माफ होत असते, मात्र, नाशिक शहरातही अनेक गणेश मंडळे असूनही दरवर्षी शुल्क माफ करण्याची मागणी करावी लागते. यंदा देखील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशीच मागणी करण्यात आली होती. पोलीस आयुक्तालायात झालेल्या गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली, तेव्हा आमदार देवयानी फरांदे यांनी देखील शुल्क माफ करण्याची सूचना महापालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना केली होती. त्यानंतर  हा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत मांडण्यात आला होता. तो मंजुर करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याने मंडळांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती