त्यानंतर काल एसीबीने शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी करत अटक केली होती. यानंतर त्यांच्या घराची एसीबीने झाडाझडती घेतली असता त्यात ८५ लाख रुपये रोख व ३२ तोळे सोने, २ फ्लॅट आणि एक प्लॉट असे घबाड हाती लागल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी वालावलकर म्हणाल्या की, तक्रारदार एका शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक होते. काही कारणांनी त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांनी शिक्षण लवादाकडे दाद मागितली असता बडतर्फीला स्थगिती देण्यात आली. तरीही शैक्षणिक संस्था त्यांना कामावर पुन्हा रुजू करत नसल्याने त्यांना कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांनी ५० हजारांची लाच मागितले.
त्यानंतर त्यांचे लिपिक नितीन जोशी यांनी ते पत्र बनवून देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर नियमानुसार धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली. घर झडतीत ८५ लाख रुपयांची रोकड, ३२ तोळे सोने, तीन प्रॉपर्टीचे कागदपत्र, काही बँक अकाउंट्स सापडले आहेत. त्यांच्या राहत्या पुढील तपास पोलीस करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. फ्लॅटची किंमत तब्बल दिड कोटी असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.