राजन साळवींच्या कुटुंबालाही ACB ची नोटीस, 20 मार्चला होणार चौकशी

शुक्रवार, 17 मार्च 2023 (09:19 IST)
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी एसीबीकडून 20 मार्च रोजी चौकशी केली जाणार आहे. याबाबत साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
माध्यमांशी बोलताना राजन साळवी म्हणाले की, राजन साळवी काय आहे हे माझ्या जिल्ह्याला माहित आहे. त्यामुळे कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही. मी संपूर्ण सहकार्य करणार आहे.वैभव नाईकांना नोटीस आली. त्यानंतर मला आली. केंद्रीय यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, म्हणून आम्हाला घाबरवण्यासाठी असा प्रयत्न केला जात आहे. पण भविष्यात महाराष्ट्रातील जनता त्यांना दाखवून देईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, माझी आई गेले दोन आठवडे बेडवर आहे. तिचि परिस्थिती बिकट आहे.अस असतानाही मी अधिवेशनाला उपस्थित राहिलो आहे. आम्ही शिवसेने सोबत आहे. माझ्या कुटुंबाला नाहक त्रास दिला जातोय. मला नोटीस पाठवल्यानंतर माझ्या कुटुंबाला नोटीस पाठवण्याची गरज काय?असा सवालही राजन साळवी यांनी केला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती