नाशिक: तरुणीने लग्नास नकार दिल्याने 7 वाहनांची जाळपोळ

शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (08:02 IST)
नाशिक : काठेगल्लीत दोघांकडून चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा सात वाहनांची जाळपोळ केली. परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न केला. वाहने जळून मोठे नुकसान झाले आहे. भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना ताब्यात घेतले आहे.
 
तरुणीशी ओळख असलेल्या संशयित सुमित पगारे (रा. धम्मनगर कथडा) याने तरुणीशी ओळख वाढवून संबंध प्रस्थापित करून विवाह करण्याची मागणी केली. तरुणीने त्यास नकार दिला.
संशयिताने राग मनात धरून मंगळवार (ता.14) संशयिताने त्याचा सहकारी मित्र संशयित विकी जावरे (रा. काठेगल्ली) याच्या मदतीने तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी चारचाकी आणि रिक्षाची जाळपोळ करून नुकसान केले.
सर्वप्रथम संशयीतांनी मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तरुणीचा भाऊ त्यांच्या अपार्टमेंटच्या बाहेर बसलेला असताना त्यास मारहाण केली. त्यानंतर रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा त्याठिकाणी येऊन वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळपोळ केली. आरडा ओरड झाल्याने अपार्टमेंटच्या खाली येऊन पाहिले. वाहने जळत असल्याचे आढळून आली.
 
स्थानिक रहिवाशांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बहुतांशी वाहने जळून राख झाली होती. यापूर्वीही संशयित पगारे याने तरुणांच्या दुचाकीची तोडफोड केली होती. घटनेनंतर अपार्टमेंटच्या पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात दोघे संशयित आढळून आले.
 
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भद्रकली गुन्हे शोध पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात अवघ्या काही तासात दोघा संशयीतांना ताब्यात घेतले.

घडलेल्या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सणासुदीत घटना घडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. संशयीतांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली. पोलीस अधिक तपास करत आहे.
 









Edited by- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती