राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व बाबा ग्रुपचा अध्यक्ष नालसाब मौला अली मुल्ला (वय ४८, रा. माने चौक, शंभरफुटी रस्ता ) याचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी सनी सुनिल कुरणे (वय २३, जयसिंगपूर), विशाल सुरेश कोळपे (वय २०, रा. लिंबेवाडी, ता. कवठेमहांकाळ), स्वप्निल संतोष मलमे (वय २०, रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) या तिघांना अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.
मृत नालसाब मुल्ला हा शनिवारी रात्री आठ वाजता त्याच्या बाबा सप्लायर्स या ऑफीसच्या दारात बसला असता दोन दुचाकीवरून हल्लेखोर आले. तेव्हा दोघांनी मुल्ला याच्याजवळ येऊन पिस्तुलातून गोळ्या घातल्या. तसेच दोघांनी तलवारीने हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर शिवीगाळ, दमदाटी करत, तलवार नाचवत आणि हवेत गोळीबार करत अंधारात पळून गेले. या खुनानंतर अधीक्षक डॉ. तेली यांनी जिल्ह्यात नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच खुनामागे काय कारण आहे, याचा शोध घेऊन हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके रवाना केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे व सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांना हा खून जयसिंगपूरच्या सनी कुरणे आणि साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली. तसेच संशयित अंकली ते हरिपूर रस्त्यावर थांबल्याचे समजले. पथकाने तेथे जाऊन सनी, विशाल, स्वप्निल आणि अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मुल्ला याच्या खुनाची कबुली दिली.