मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी अडचणी आणण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. लटके यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त इक्बाल सिंग यांच्याकडे दिला आहे. मात्र, तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. जोपर्यंत राजीनामा मंजूर होत नाही तोवर लटके यांना उमेदवारी करता येणार नाही. त्यामुळे याप्रश्नी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त इक्बाल चहल यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
ऋतुजा लटले यांनी आज महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेतली. राजीनामा अद्याप मंजूर न झाल्याबद्दल त्यांनी आयुक्तांना सांगितले. त्यावर आयुक्त म्हणाले की, ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत आहेत. त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीामा स्विकारण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. पुढचे ३० दिवस म्हणजेच ३ नोव्हेंबरपर्यंत राजीनाम्याची प्रक्रिया सुरू राहील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
ऋतुजा लटके यांचे पती आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. मात्र, अद्याप महापालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम..
निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार १४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करणे, १५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर ३ नोव्हेंबर रोजी मतदान, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मतदारांची ओळख पटावी म्हणून नेमकी कोणती ओळखपत्रे लागतील, त्याची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.