उष्णतेची लाट आता ओसरली असली तरी शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात उष्म आणि दमट स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २७ अंशाच्या आसपास राहणार आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून, उकाडा कायम असल्याने मुंबईकर घामाघूम झाले होते.
मुंबईला आता उष्णतेच्या लाटेचा इशारा नाही. मात्र आर्द्रता अधिक नोंदविली जाईल. त्यामुळे उकाडा कायम राहील. १८ ते २२ एप्रिलपर्यंत मुंबई महानगर प्रदेशात असेच हवामान राहील.
-सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
कोकणातील एकाकी भागात उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील एकाकी भागात उष्णतेची लाट येईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाटयाचा वारा वाहील.