मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात येत्या ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे. परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत.
मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर मुंबईच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हे लक्षात घेत मुंबई महानगरपालिका अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी सज्ज असून महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापालिकेच्या तयारीची माहिती दिली. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला.