प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावरुन पडून मृत्यू झाला आहे, ते ६० वर्षांचे होते. (शनिवारी) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रॅपलिंग करताना तोल गेल्याने कड्यावरुन ते दरीत कोसळले. त्यांच्यासोबत ३० जणांची टीमही अडकून होती. या दुर्घटनेची माहिती कळताच बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, आज सकाळी सावंत यांचा मृतदेह बचाव पथकाला आढळून आला. गोरेगाव येथील ते रहिवासी होते.
अरुण सावंत हे त्यांच्यासोबत रॅपलिंगसाठी आलेल्या ३० जणांच्या टीमचे नेतृत्व करीत होते. दोर लावत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खोल दरीत कोसळले. यानंतर त्यांच्या टीममधील काही जणांनी पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर सावंत यांचा शोध घेण्यासाठी मुंबई, पुणे आणि लोणावळा येथून पाच रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रविवारी त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला.