पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवरील मोशीतील टोलनाका शनिवारपासून बंद झाला आहे. मुदत संपल्याने आयआरबी कंपनीने शुक्रवार रात्री 12 वाजल्यापासून टोल वसुली बंद केली. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतूक कोंडीतून सुटका झाली. मोशीतील टोल नाक्यावर जुन्नर, खेड, आंबेगाव आदी ग्रामीण भागातून शहराकडे, तर पिंपरी-चिंचवड, पुणे शहराकडून चाकण औद्योगिक परिसराकडे जाणार्या वाहनचालकांना टोल भरण्यासाठी थांबावे लागत होते. औद्योगिक परिसरातील मालाची वाहतूक करणारी जड वाहने या मार्गावरून जात होती. वाहनांची मोठी वर्दळ होती. टोल नाक्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती.
मोशीतील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागत होत्या. त्यामुळे रांगेमध्ये बराच वेळ थांबावे लागत असल्याने वाहनचालकांना वेळेचा आणि इंधनाचा फटका बसत होता. टोल नाक्याची मुदत संपली आहे. त्यामुळे टोल वसुली आजपासून बंद झाली आहे. टोल वसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीने तिथे फलक लावला आहे. सर्व वाहनधारकांना कळविण्यात येते की भारतीय राजपत्र (स 1305 गुरुवार 15 डिसेंबर 20 नुसार मोशी व चांडोली (राजगुरूनगर) या प्रकल्पाची 8 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 12 नंतर समाप्त होत आहे. त्यामुळे मेसर्स ए टी आर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (आय आर बी) कडून पथकर वसुली बंद करण्यात आली आहे. याची नोंद घ्यावी, असा सूचना फलक आयआरबी कंपनीने टोलनाक्यावर लावला आहे. टोल वसुली बंद झाल्याने वाहतूक कोंडी होत नाही. वाहने सुसाट जात आहेत. टोल बंद झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.