मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, लवकरच अनेक ठिकाणी कोसळणार

सोमवार, 26 जून 2023 (08:08 IST)
मुंबई : मान्सूनने  संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. भारतीय हवामान विभागाने याबाबतची घोषणा केली. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
 
दरम्यान, काही भागात मान्सून दाखल होऊनही पावसाने रविवारी उघडीप दिली. मराठवाड्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. मात्र, हे ढग कोरडे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे शेतक-यांची चिंता कायम आहे.
 
हवामान खात्याच्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मिरात पुढील २ दिवसांत मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
 
मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. मुंबईत ११ जून रोजी मान्सून दाखल होण्याची तारीख आहे तर दिल्लीत २७ जून रोजी मान्सून दाखल होतो. मात्र, यावर्षी मुंबईत १४ दिवस उशिराने मान्सून दाखल झाला तर दिल्लीत २ दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले. परवापासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या विविध भागांत चांगला पाऊस कोसळत आहे. त्यानंतर आज हवामान विभागाने मुंबईसह दिल्लीत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. मान्सूनने संपूर्ण तेलंगणा, कर्नाटक व छत्तीसगड तसेच कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला आहे. तसेच विदर्भातही आगेकूच केली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा व उत्तराखंडमध्येही पाऊस दाखल झाला आहे.
 
राज्याच्या विविध भागांत हजेरी
राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. कुठे हलका ते मध्यम स्वरुपाचा तर कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. राज्यातील वाशिम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार, कोल्हापूर या भागात पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
 
बीड, जालना, लातूर जिल्ह्यात हजेरी
लातूर, नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. मान्सून दाखल झाल्याने उदगीर परिसरात दोन तास दमदार पाऊस झाला. केज तालुक्यात वीज पडून गाय ठार झाली. नांदेडच्या किनवट मध्ये पाऊस झाला. मात्र, अद्याप सरसकट पाऊस नाही, तर काल ज्या भागात पाऊस झाला, त्यापैकी ब-याच भागात रविवारी पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती