विदर्भाच्या काही भागात मान्सून पोहोचला, संपूर्ण महाराष्ट्रात कधी बरसणार?

शनिवार, 24 जून 2023 (07:37 IST)
बराच काळ रेंगाळलेल्या मान्सूनची आगेकूच सुरू झाली आहे. विदर्भाच्या काही भागात आज (23 जून) मान्सूनचं आगमन झालं आहे.येत्या 3-4 दिवसांत महाराष्ट्र तसंच कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टिने परिस्थिती अनुकूल होत आहे.
 
मुंबईतही आज सकाळी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. पण तो मान्सून पूर्व पाऊस असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे.
 
यंदा देशात मान्सूनचं आगमन लांबल्याचं पाहायला मिळालं. सहसा मान्सून 1 जूनला केरळमध्ये पोहोचतो. यावेळी मात्र केरळमध्ये मान्सूनचं आगमन 8 जूनला झालं.
 
त्यानंतर 6 जूनला अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झालं. जसजशी या वादळाची आगेकूच होत होती, तसं ते तीव्र होत होतं. त्यामुळे मान्सूनची वाटचाल रखडली.
 
महाराष्ट्रात कोकणामध्ये मान्सून 11 जूनपर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून तो तिथेच खोळंबलेला आहे.
 
चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आवश्यक आर्द्रता निर्माण झाली नाही. परिणामी महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवेश लांबला.
 
थोडक्यात, मान्सून अंदाजाप्रमाणे येणार होता, त्यात बिपरजॉय चक्रीवादळामुळे काहीसा विलंब झाला, असं मुंबई हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं.
 
त्यानंतर हवामान विभागाने 18 ते 21 जूनच्या दरम्यान मान्सूस महाराष्ट्र आणि मुंबईत सक्रीय होईल, असा अंदाज वर्तवला. पण आता मान्सूनचं आगमन पुन्हा एकदा लांबलं आहे.
 
दरम्यान, हवामान विभागाने आणि प्रादेशिक हवामान विभागाने 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ; 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
 
पावसाची शक्यता आहे, मग महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला का म्हणजे इथे मॉन्सून ऑनसेट (Onset of Monsoon) झाला आहे का, असा प्रश्न पडू शकतो. पण हे लक्षात घ्यायला हवं, की केवळ पावसाळी हवा किंवा पावसाने जोर धरला म्हणजे मान्सूनचं आगमन झालं असं होत नाही.
 
मॉन्सून ऑनसेट म्हणजे काय?
भारताच्या मुख्य भूमीवर नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतात. सामान्यतः अंदमान-निकोबार बेटांवर 15 ते 20 मे दरम्यान आणि केरळमध्ये मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांतच पाऊस पडायला सुरुवात होते.
 
पण फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नाही. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.
 
केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.
 
महाराष्ट्रातही विशिष्ठ प्रदेशांनासार अशी मानकं ठरली आहेत. ती पूर्ण झाली, तरच महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचं जाहीर होतं.
 
मान्सून लांबल्यामुळे पाऊस कमी पडणार?
मान्सून उशीरा आल्यामुळे यंदा पाऊसही कमी पडणार का, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण मान्सूनचं उशीरा आगमन आणि पावसाचं प्रमाण यांमध्ये थेट संबंध नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच मान्सून उशीरा आल्याने चार महिन्यांमधील सरासरी पावसावरही परिणाम होतोच, असं नाही.
 
याआधी 2003 आणि 2019 साली केरळमध्ये मान्सून 8 जूनला पोहोचला होता. 2019 ला मुंबईत मान्सूनन येण्यास उशीर केला, पण तरीही त्या वर्षी देशात सरासरीइतकाच पाऊस पडला होता.
भारतीय हवामान विभागानेही यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनच्या चार महिन्यांत सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल.
 
हवामानाचा अंदाज वर्तवणारी खाजगी संस्था स्कायमेटने मात्र यावर्षी मान्सूनवर एल् निनोचा प्रभाव जाणवेल असं म्हटलं आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होईल, असंही स्कायमेटचं म्हणणं आहे.
 
पॅसिफिक महासागरात जेव्हा एल् निनोचा प्रभाव जाणवतो, तेव्हा भारतात सहसा कमी पाऊस पडतो.
 
एल निनो म्हणजे काय?
एल निनो म्हणजे स्पॅनिशमध्ये छोटा मुलगा आणि ला निना म्हणजे स्पॅनिशमध्ये छोटी मुलगी. एरवी साधारण दोन ते आठ वर्षांच्या अंतरानं एल निनो आणि ला निना परिस्थिती उद्भवताना दिसते.
 
पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सर्वांत मोठा महासागर आहे त्यामुळे तिथल्या वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. त्यातही दक्षिण गोलार्धात भूभाग कमी असल्यानं, प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातलं तापमान जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं.
 
हे सगळं घडतं व्यापारी वाऱ्यांमुळे. हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वाहतात.
 
या वाऱ्यांचा पॅसिफिक महासागरातल्या सागरप्रवाहावर परिणाम होतो. सामान्य स्थितीत या महासागराच्या वरच्या स्तरातलं पाणी गरम झाल्यावर आशियाच्या दिशेनं वाहू लागतं आणि खालच्या स्तरातलं थंड पाणी त्याची जागा घेतं.
व्यापारी वाऱ्यांचा वेग कमी झाला तर या वर आलेल्या पाण्याचं तापमानही वाढतं आणि मग गरम पाणी पूर्वेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या दिशेनं सरकतं. या स्थितीला एल निनो म्हणून ओळखलं जातं.
 
पण हे व्यापारी वारे जेव्हा वेगानं वाहू लागतात तेव्हा गरम पाणी आणि त्यासोबत हवेतलं बाष्प आधी आशियाच्या दिशेनं सरकतं आणि मग हे थंड पाणीही पश्चिमेकडे वाहू लागतं. त्यालाच ला निना म्हणून ओळखलं जातं.
 
The National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) ने यावर्षी एल निनोचा प्रभाव जाणवेल असं म्हटलं आहे.
 
एल निनोमुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान 4 ते 5 अंश सेल्सियसने वाढू शकतं. त्याचा परिणाम जगभरातील हवामानाच्या पॅटर्नवर होतो. विशेषतः भारत, ऑस्ट्रेलिया आणि व्हिएतनामसारख्या देशांमध्ये पावसाच्या प्रमाणावर होतो.
फक्त 26 टक्के पाणीसाठा शिल्लक
राज्यातल्या धरणांमध्ये आजच्या दिवशी ( 21 जून 2023) सरासरी 23.5 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशीच 26.72 टक्के एवढा पाणी साठा राज्यात शिल्लक होता.
 
सर्वांत बिकट परिस्थिती पुणे विभागाची आहे. पुणे विभागातल्या धरणांमध्ये आज सरासरी फक्त 11.73 एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा समावेश होतो.
 
नागपूर विभागाची परिस्थिती सध्याच्या घडीला बरी आहे. राज्यात सर्वांत जास्त पाणीसाठा आज (21 जून 2023) नागपुरात आहे. नागपूर विभागात 37.33 टक्के एवढा पाणीसाठा आहे. नागपूर विभागात पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांचा समावेश होतो.
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती