अण्णा भाऊ साठे आणि सावरकरांचं कर्तृत्व सारखेच : मोहन भागवत

शनिवार, 11 डिसेंबर 2021 (07:24 IST)
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या एवढंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं कर्तृत्व आहे, असं सांगतानाच या दोघांमध्ये मला काहीही फरक दिसत नाही, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.
विवेक साप्ताहिकाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे मत व्यक्त केलं. अण्णा भाऊ साठे यांचं कार्य मोठं आहे. प्रामाणिकता हा त्यांचा मोठा गुण होता. आजच्या जगात प्रामाणिकता हा दुर्मिळ गुण आहे. पण तो त्यांच्याकडे होता. ते जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रामाणिकपणे जगले. त्यांच्या एवढा प्रामाणिकपणा आमच्या पुढारी मंडळींमध्ये आला तर देश कित्येक पटीने पुढे जाईल. प्रामाणिकपणा हा जन्मजात असावा लागतो, असं भागवत म्हणाले.
अण्णा भाऊ साठेंप्रमाणेच सावरकरांचे कर्तृत्व होते. मला अण्णा भाऊ साठे आणि सावरकरांमध्ये कसलाही फरक दिसत नाही, असं सांगतानाच अण्णा भाऊ साठे हे एक धार्मिक व्यक्तीमत्त्व होतं. त्यांनी सत्याची तपश्चर्या केली. सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या या चार शब्दात त्यांचं पूर्ण जीवन होतं, असंही त्यांनी सांगितलं. जगाचं दुःख दूर करण्यासाठी त्या व्यक्तीला दुःखाचा प्रत्यक्ष अनुभव द्यावा, असं कदाचित नियतीला वाटत असेल असं वाटतं. अण्णा भाऊ साठे यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाची अशी उच्च प्रतिभा असावी तर ती सावरकरांमध्ये होती, असंही त्यांनी सांगितलं.
 
अण्णा भाऊंचा जितका व्हायला हवा तितका परिचय महाराष्ट्राला देखील झालेला नाही. त्यांच्यावरील या ग्रंथाच्या माध्यमातून नक्की लोकांपर्यंत तो पोहचेल. अण्णा भाऊंच हे स्थान अटळ आहे, ते नाकारता येणार नाही. अण्णा भाऊंच साहित्य कोणीही नाकारू शकणार नाही. त्या साहित्यातून समाजातील मूल्य ढासळणार नाही. वाद निर्माण होतील असं काही त्यांच्या साहित्यात नाही. भारतीय मूल्यांचा परिपोष व्हावा असं त्यांचं साहित्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती