ओला दुष्काळ जाहीर करा : राज ठाकरे

गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (08:15 IST)
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहेत. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाने हाहाकार घातला आहे. या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच अनुषंगाने राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अनेक नेत्याकडून होत आहे. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. त्यांनी एक पत्रक लिहिले असून नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे.
 
काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे.
 
अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला-शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.
 
प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या आणि पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याएवढी ताकद आता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकवीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती