म्हणून पोलीस आयुक्तांनी राज ठाकरे यांची घेतली भेट

गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (16:19 IST)
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी मनसेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. मात्र, विनापरवानगी लावण्यात आलेली राजकीय होर्डिंग्ज हटविण्यात आली. अशी कोणी राजकीय होर्डिंग्ज  यापुढे लावली तर कारवाई होणारच, अशा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडेयांनी दिला आहे. दरम्यान, त्यानंतर पोलीस आयुक्तांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. 
 
मनसेकडून लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले होते. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना मनसेने शहरभर बॅनर लावले होते. मात्र, पुन्हा मनसेने स्वागताचे बॅनर रात्रीतून झळकवले. मनसेने काल कारवाई वेळी रास्ता रोखण्याचा प्रयत्न देखील केला होता. बॅनरची परवानगी नसल्याने पालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करताना हे बॅनर हटविले होते. 
 
मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याशी झालेली भेट सौहार्दपूर्ण होती. महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ही भेट घेतल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. राजकीय पक्ष कोणताही असो नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई होणारच, असे पोलीस आयुक्त पांडे यांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती