मीरा बोरवणकर यांचा थेट अजित पवार यांच्यावर आरोप, शाहिद बलवाचंही घेतलं नाव
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (07:34 IST)
पुण्यातील येरवडा तुरुंगाबाहेरील जमीन खासगी बिल्डरला देण्याच्या प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आता थेट राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतलं आहे.
"अजित दादा म्हणाले मॅडम तुम्ही यात पडू नका" असा थेट आरोप मीरा बोरवणकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला. या जमीन प्रकरणात टू जी घोटाळ्यातील आरोपी शाहिद बलवा याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
त्यांच म्हणाल्या की, " आपल्यामुळे येरवडा तुरुंगाबाहेरील 3 एकर जमीन खासगी बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचली आहे, त्यामुळे आता त्याच्या चौकशीची आवश्यकता मला वाटत नाही."
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात अजित पवार यांचं नाव न घेता जिल्ह्याचे पालक मंत्री 'दादा' असा म्हणतं गंभीर आरोप केले होते.
त्यात त्यांनी अजित पवारांच्या नावाचा थेट उल्लेख केला नव्हता. पण माध्यमात बातम्या आल्यानंतर सोमवारी (16 ऑक्टोबर) दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांचं नाव घेतलं आहे. तसंचं खासगी बिल्डर म्हणून शाहिद बलवा होता, असाही खुलासा त्यांनी केलाय.
बोरवणकर यांनी म्हटंल की, मी माझ्या पुस्तकात 38 प्रकरणाचा उल्लेख केला आहे, पण माध्यमं एकच प्रकरणात प्रश्न विचारत आहेत. त्या पुण्यात पोलीस सेवेत असताना त्यांना या 3 एकर जमिनीचा लिलावाबद्दल विचारणा करण्यात आली होती.
पोलीस हिताच्या विरोधात असल्यानं मी या जमीनीच्या लिलावाला ठाम विरोध केला, तत्कालीन पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही लिलाव प्रक्रिया सुरु होती. आधीच्या पोलीस आयुक्तांनी याला संमती दर्शवली होती. त्यांची बदली झाल्यानंतर या जागेबाबत मला विचारणा करण्यात आली. खासगी बिल्डरला जागा हस्तांतरीत करण्यास मी विरोध दर्शवला. त्यामुळे ही जागा वाचली. ही जागा आजही पोलिसांच्या ताब्यात आहे. ही जागा पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे," असं बोरवणकर यांनी म्हटलं आहे.
इथं पुणे पोलीस मुख्यालय किंवा पोलिसांसाठी वसाहत बांधावी, असं मी म्हटलं होतं. अशी मोक्याची जागा मिळणार नाही अशी माझी भूमिका होती.असं बोरवणकर या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणतात की, "मी विरोध केल्यामुळे ती 3 एकर जागा खासगी बिल्डरला दिली गेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची गरज मला वाटत नाही. सरकारला जर चौकशी करायची असेल तर ते करु शकतात."
या प्रकरणी मला कुणीही नोटीस पाठवली तर मी त्याला उत्तर द्यायला तयार आहे,असं बोरवणकर यांनी म्हटलंय.
भ्रष्टाचाराबाबत बोलताना त्यांनी आरोप केला की, "राज्यात बिल्डर, राजकारणी आणि ब्यूरोक्रॅट्स यांचं संगनमत आहे. "
येरवडाचा मॅप अजित पवार यांनी फेकून दिला होता आणि तत्कालीन गृह मंत्री आर आर पाटील यांच्या विषयी काही शब्द वापरले होते का? असा प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या की "अजित पवार यांनी मॅप फेकला होता. पण आर आर पाटील यांच्या विषयी काय बोलले हे मी सांगू शकत नाही."
बोरवणकर या दिल्लीतील पत्रकार परिषदेत आणखी काही खुलासे केले, त्यांनी सांगितलं की, "माझी सेवेची दोन वर्ष शिल्लक राहली असताना पुण्याच्या एडिशनल डीजी सीआयडी कार्यालयात मला बदली हवी होती, पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितली आघाडी धर्म पाळतो म्हणून नियुक्ती होऊ शकत नाही. मग कारागृह विभागाचं पद घ्या असं सांगितलं मी ते स्वीकारलं कारण माझा कुटुंब पुण्यात राहत होतं."
"माध्यमांना मी सांगू इच्छिते की माझ्या पुस्तकात 38 प्रकरणांबाबात लिहिलंय पण माध्यम एकच विषयाबाबत प्रश्न विचारत आहेत.
मी पुस्तक एक वर्षापूर्वी दिलं होतं. दोन महिन्यापूर्वी पब्लिश झालं आहे. त्यामुळे आत्ताच हे पुस्तक आलं असा आरोप करण चुकीचं आहे," असं त्या म्हणाल्या