मालेगाव : काँग्रेस महापौरांसह 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, दोन्ही पक्षांतील तणाव वाढला
शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (09:00 IST)
मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्वांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीत सरकारमध्ये एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षांमध्येच अशा स्वरुपात नेते-कार्यकर्त्यांचं पक्षांतर झाल्यामुळे या विषयी एकच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढल्याची चिन्ह आहेत.
मालेगाव शहरातील बडं राजकीय प्रस्थ समजले जाणारे माजी आमदार रशीद शेख आणि त्यांचे कुटुंबीय काँग्रेस पक्षामधून राजकारण करत होते. पण ते राजकारणही तळ्यात-मळ्यात स्वरुपात असल्याचं अनेक राजकीय कार्यक्रमांप्रसंगी दिसून आलं होतं.
अखेर, रशीद शेख आणि त्यांची पत्नी ताहेरा शेख यांच्यासह सत्तावीस नगरसेवकांनी 25 जानेवारी रोजी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
त्यानुसार 27 जानेवारीला उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश पार पडला.
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाबाबत माहिती देताना रशीद शेख म्हणाले, "मालेगाव शहराच्या विकासासाठी आम्ही काम करत असून अजूनही काम करायचे आहे. त्यासाठी निधी व योजनांना मंजूरी हवी आहे. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणीही मंत्री आम्हाला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आमची नाराजी होती.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र वीजेच्या ज्वलंत प्रश्नासह गेल्या दोन वर्षात मालेगाव शहरासाठी काहीही मोठे काम किंवा विकास झालेला नाही. हे चालण्यासारखे नाही. त्यामुळेच आम्ही काँग्रेस पक्षात राहून काहीही उपयोग नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे."
काँग्रेसचे सदस्य असलेले शेख कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या वाटेवर उघडपणे होते.
विशेष म्हणजे शेख पिता पुत्र दोघेही माजी महापौर आणि माजी आमदार आहेत, तर राशीद शेख यांच्या पत्नी विद्यमान महापौर आहेत. शेख यांचे पुत्र व माजी आमदार आसीफ शेख यांनी सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
मालेगावमध्ये निहाल अहमद यांच्यानंतर रशीद शेख यांचं वर्चस्व मानलं जातं. रशीद शेख आणि त्यांचे चिरंजीव आसिफ शेख प्रत्येकी एक वेळा मालेगाव शहरात आमदार आणि महापौर राहिले.
"मी आणि माझा सर्व परिवार हा पिढीजात काँग्रेसचे आहेत आणि होतो. पूर्वी चे काँग्रेस चे पुढारी हे छोट्या मोठ्या सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत असत आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील काम करीत असत पण मध्यंतरी काळातील पुढारी मात्र पक्ष वाढीसाठी नव्हे तर पक्ष संपवण्यासाठी काम करताय. आम्ही शहर विकासासाठी काँग्रेस च्या नेत्यांना अनेकदा जाऊन भेटलो पण आता काँग्रेसचे नेते फ़क्त आपापल्या मतदारसंघासाठीच काम करताना दिसतायेत. सत्तेत असूनही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे लक्ष नसल्याचे," आरोप माजी आमदार शेख रशीद यांनी केलेत.
याविषयी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे म्हणाले, "आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढत होतो आणि त्यावेळेस पक्षाचे शहरातील नेतृत्व हे शेख कुटुंबियांकडे होते. शहरातील ज्या भागातील मुस्लिम मतदान आम्हला मिळायला पाहिजे होते ते ह्या लोकांच्या विश्वासघाताने आम्हला मिळाले नाहीत. कारण गेल्या पंधरा वर्षात शेख रशीद आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे हितसंबंद मनपाच्या त्यांच्या युतीतून दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनी मला मदत नकरता उलटपक्षी काम केले आहे. त्यांना काँग्रेस ने घडवले असून त्यांच्या जाण्याने अजून सुप्त असलेल्या लोकांची मोठी फळी असून पुन्हा ते जोमाने काम करणार आहेत. मालेगांव हे मूळ काँगेस ला मानणारे असून लवकरच त्याबाबत नेतृत्व मिळेल."
शेख कुटुंबीय आणि एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल हे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात.
2017 मध्ये झालेल्या मालेगाव महापालिका निवडणुकीत मुख्य लढतसुद्धा या दोन्ही राजकीय गटांमध्येच झाली होती. त्यावेळी मौलाना मुफ्ती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जनता दलाबरोबर युती केली होती.
84 जागांपैकी काँग्रेसला 28 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस+जनता दल यांना 26, शिवसेना 13, भाजपला 9, MIM पक्षाला 7 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता.
त्यावेळ मौलाना मुफ्ती यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने महाविकास आघाडी प्रयोग होण्याआधी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसला मालेगावात पाठिंबा दिला.
त्यावेळी माजी आमदार रशीद शेख आणि शिवसेना नेते दादा भुसे यांच्यातील वाटाघाटीमुळे कॉँग्रेस आणि शिवसेना एकत्र येवून कॉँग्रेसचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर असं समीकरण तयार झालं.
यानंतरही रशीद शेख यांनी वारंवार मुफ्तींविरोधात भूमिका घेतली. त्यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता.
दरम्यान, आमदार मौलाना मुफ्ती यांनी 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून MIM पक्षात प्रवेश केला. या निवडणुकीत ते विजयी होत आमदार झाले. तर आसिफ शेख यांना सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला होता.
शेख कुटुंबीयांचं राजकारण यंत्रमाग (लूम) व्यवसायातील कामगारांवर जास्त चालतं, असं म्हटलं जातं. गेल्या काही वर्षात ह्या यंत्रमाग व्यावसायिक विजेच्या प्रश्नामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. ऊर्जा खातं काँग्रेसकडे असूनही यासंदर्भात समस्या मिटत नसल्याची रशीद शेख यांची तक्रार होती. याच घटनाक्रमात त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला जशास तसं उत्तर देणार - नाना पटोले
या प्रकरणावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज (27 जानेवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी या विषयावर अत्यंत सावध व सूचक प्रतिक्रिया दिली. राजकारणात हे स्वाभाविक आहे, पण त्याबाबत नाराजी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आमचे लोक त्यांच्याकडे गेले आहेत. याबद्दल नाराजी असण्याचं कारण नाही. हा राजकारणाचा भाग असतो. हे आम्ही फार गांभीर्याने घेत नाही. गेले त्यापेक्षाही जास्त नेते-कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये येणार आहेत, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
ते म्हणाले, " राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला न कळवता-विचारता संबंधित नगरसेवकांचा पक्षप्रवेश करवून घेतला, पण याबद्दल आपण नाराज नाही."
"त्यांच्याही पक्षातील अनेक नेते-कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येतील. हे गोपनीय असतं. त्याच्याबद्दलची माहिती कुणालाही सांगायची नसते, राजकारणात जशास तसं उत्तर दिलंज पाहिजे," असं पटोले यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, "स्वखुशीने कुणी त्यांच्याकडे जात असेल, तर त्याबद्दल नाराजी कळवण्याचीही गरज नाही. हे राजकारण आहे. त्यांनी केलं ते गैर आहे, असं आम्ही म्हणणार नाही. पण आम्ही केलं तर ते गैर नाही, असं त्यांनाही वाटलं पाहिजे."
मालेगावच्या राजकारणाचा बाज वेगळा
मालेगाव मधील स्थानिक राजकीय संघर्ष आणि काँग्रेस सत्तेत असूनही रशीद शेख यांना उपोषण करण्याची वेळ आली होती. याचा अर्थ पक्षाने त्यांना योग्य पाठिंबा दिला नाही, याचा उल्लेख त्यांनी मालेगाव मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही केला होता.
राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचा वाढीव हिस्सा, ताब्यात असलेले गृह मंत्रालय आणि पुढे येवू घातलेल्या महापालिका निवडणुका व आमदारकीच्या तिकिटाचा विचार करून राजकीय दृष्ट्या शेख यांनी असा निर्णय घेतला असावा ,असं तज्ज्ञांना वाटतं.
या पक्षांतरामुळे जिल्ह्यात कॉँग्रेसचे अस्तित्व मात्र कमी झालं आहे, आधीच कॉँग्रेस जिल्ह्यात कमजोर होती. आता आणखी क्षीण झाली आहे, असं मत दिव्य मराठीच्या नाशिक आवृत्तीचे स्टेट एडिशन एडिटर अभिजीत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.
ते म्हणतात, "मालेगावमध्ये एकेकाळी आमदारकी आणि महापालिका दोन्ही कॉँग्रेस कडे होत्या ,
राष्ट्रवादीने आता थेट महापालिकच पळवली. त्यामुळे मालेगांवमध्ये कॉँग्रेसचे अस्तित्व अगदीच नगण्य झाले आहे.
कुलकर्णी यांच्या मते, "मालेगावच्या राजकारणाचा बाज खूप वेगळा आहे, पण यांचा खूप काही परिणाम जिल्ह्याचा राजकारणावर होणार नाही. राज्य स्तरावर मात्र थेट संदेश दिला गेला आहे . आणि हे पक्षांतर त्यापूर्तेच मर्यादित राहील."
राष्ट्रवादी काँग्रेस आणि रशीद शेख यांना लाभ
या पक्षांतरमुळे राष्ट्रवादी आणि सजेकह रशीद कुटुंबीय या दोघांनाही लाभ आहे, दोघांची भूमिका परस्परपूरक अशीच आहे, असं मत पुण्यनगरीच्या नाशिक आवृत्तीचे संपादक किरण लोखंडे यांनी व्यक्त केलं.
ते म्हणतात, "राज्यात कॉँग्रेसच्या ताब्यात मालेगाव ही एक महानगरपालिका होती. पण, पक्षाकडून पाठिंबा नसल्याने रशीद नाराज झाले होते. देशमुख, चव्हाण यांच्यासारखे मुख्यमंत्री होते त्याकाळी मालेगाव महापालिकेला निधी मिळायचा, याचा त्यांनी उल्लेख केला. पण यंदा नाना पटोलेंच्या कॉँग्रेसकडून तसे झाले नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना मदत मिळाली."
"काँग्रेसला ही महापालिका राखता आली असती पण ती आता राष्ट्रवादीकडे गेली आहे. शिवाय आगामी काळात आघाडी झाली तर विधानसभेची मालेगाव मध्यची जागा राष्ट्रवादीकडे असेल, असे संकेतही यामधून दिसून येतात," असं लोखंडे यांना वाटतं.