महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. वसंत खंडेलवाल यांना 438 तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना 328 मतं मिळाली आहेत.
गोपिकिशन बाजोरियांचा पराभव
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे.
वसंत खंडेलवाल विजयानं शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
भाजप आणि शिवसेना या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा समोर आले होते. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरींचे निकटवर्तीय मानले जातात. वसंत खंडेलवाल यांचा तीन जिल्ह्यातील जनसंपर्क त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्या विजयामुळं मतमोजणी केंद्रावर जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. निराश झालेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र सोडलं आहे.
विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले होते. तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांनी विधान परिषदेत दिमाखात प्रवेश केला आहे. नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा येथील पराभवामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.