या परीक्षा या सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. सकाळच्या सत्रात 11 वाजता पेपर सुरू होणार असल्याने मुलांना 10.30 वाजता दालनात हजर राहावे लागणार तर दुपारी 3 वाजता पेपर सुरू होणार असल्याने 2.30 वाजता हजर राहावे लागणार आहे. तसेच 11 च्या पेपरला 2 ऐवजी 2.10 असा वाढीव 10 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.
बोर्डाच्या या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मुलांसह पालकांना देखील या परीक्षेची काळजी असते. पूर्वी मुलांना उत्तर पत्रिका नीट वाचून समजून घेता यावी तसेच त्याचा अंदाज घेता यावा यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या आधी प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिकेचे वाटप केले जात होते. मात्र पेपर फुटीच्या घटना घडल्यामुळे निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची पद्धत गेल्या वर्षीपासून रद्द करण्यात आली होती. अशात विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका वाचून पेपर सॉल्व करण्यास उशीर होत होता. मुलांना वेळ कमी पडत असल्याचे लक्षात घेऊन परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर मुलांना आणखी 10 मिनिटे वाढीव वेळ दिला जाणार आहे.