तसेच शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामरा याला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोन समन्स पाठवले होते. या प्रकरणात, कलाकाराच्या वकिलाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून महाराष्ट्राच्या न्यायालयांमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ मागितला आणि तोपर्यंत अंतरिम संरक्षणाची मागणी केली. यावर उच्च न्यायालयाने त्यांना ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
याबाबत उच्च न्यायालयाने नोटीसही बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ एप्रिल रोजी होईल. कुणाल कामरा याला कथित धमक्यांमुळे महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये जाता येत नसल्याचे आढळल्यानंतर न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी हा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की, कुणाल कामराच्या वकिलाने वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या सादर केल्या, ज्यामध्ये त्याला देण्यात येणाऱ्या धमक्यांविषयी उल्लेख होता. तसेच मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये एका स्टँड-अप कॉमेडी शो दरम्यान एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कामराच्या वकिलाने त्यांना सुमारे ५०० धमकीचे फोन आले, असे त्यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले.