कोल्हापूरकरांचा भाजपला दणका; पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जाधव विजयी

शनिवार, 16 एप्रिल 2022 (16:15 IST)
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ धावांनी पराभव केला आहे.
 
भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली. त्यामुळेच भाजपच्या केंद्रीय नेत्यांपासून राज्यातील नेत्यांच्या अनेक सभा, मेळावे आणि बैठका झाल्या. त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचेच असल्याने आता त्यांचीही प्रतिष्ठा या पोटनिवडणुकीत पणाला लागली आहे. या निवडणुकीतील सभांमध्ये भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याची चर्चाही झडली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याची उत्सुकता राज्यामध्ये होती.
 
आज सकाळीच मतमोजणी सुरू झाली. जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. जाधव यांनी तब्बल १३ हजार मतांपेक्षा अधिक आघाडी घेतल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला. काही वेळातच त्यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली.  या विजयानंतर काँग्रेस सह महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वागत केले आहे. जनताच योग्य न्याय करते, जातीयवादी शक्तींना हा दणका आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोल्हापूरमधून प्रथमच महिला आमदार विधिमंडळात जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती