महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते श्री. केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, माजी आ. नरेंद्र पवार, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश चर्चा प्रतिनिधी प्रेरणा होनराव आदी यावेळी उपस्थित होते.
अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगूस आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे, असा सल्लाही श्री. उपाध्ये यांनी दिला. गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असा आरोप करून, संयमी राजकारण करणारे शरद पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
श्री. शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावरील वैयक्तिक टीका असमर्थनीय आहे. पण कायदेशीर कारवाई सुरू असतानाही मारहाणीचे आदेश देणे व दहशत पसरविणे यातून राज्याची कायदा सुव्यवस्था संपविण्याचा कट उघड होतो, असेही ते म्हणाले. २५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा या उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे वैफल्य आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्याला वेठीस धरत असतील, तर पवार यांनी त्यांना आवर घालावा असे आवाहनही त्यांनी केले. खैरनार यांच्यासारख्या अधिकाऱ्याने प्रतिमा उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम उघडूनही विचलित न होता शांत राहणाऱ्या पवार यांच्यावर एका अभिनेत्रीने केलेल्या टीकेमुळे राज्याची कायदा सुव्यवस्था वेठीस धरण्याच्या हालचाली याच वैफल्यातून सुरू आहेत. पोलिसांना हाताशी धरून त्याची योजनाबद्ध कार्यवाही सुरू असल्याचा संशयही श्री. उपाध्ये यांनी व्यक्त केला.