केबीसी घोटाळा:मुख्य सूत्रधार चव्हाणला 15 खटल्यांमध्ये जामीन मंजूर

गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (21:07 IST)
राज्यातल्या बहुचर्चित केबीसी आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 2016 मध्ये त्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. 7 वर्षांपासून तो कारागृहात आहे. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने सर्वोच्च न्यायालयालयात त्याने अपील केले होते. 15 खटल्यांमध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
 
दामदुप्पट पैसे देण्याचे आमिष देत राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांसह राजस्थानमधील गुंतवणूकदारांनी केबीसी कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. गुंतवणूकदाराला 65 लाखांचा गंडा घातल्याचा पहिला गुन्हा आडगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यासह परराज्यातील गुंतवणूकदारांनी चव्हाण आणि कंपनीच्या संचालकांविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चव्हाण सिंगापूरला फरार झाला होता.
 
त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलडाणा, नांदेड, हिंगोली येथे प्रत्येकी एक, परभणी येथे 14 तर, राजस्थानात दोन असे एकूण 23 गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2016 मध्ये चव्हाणला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली तेव्हापासून तो मध्यवर्ती कारागृहात होता. चव्हाणला जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, केबीसी प्रकरणातील दाखल सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती