शरद पवार म्हणतात, 'तुम्ही माझं वय झालंय म्हणता, तुम्ही माझं काय बघितलंय?'

गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (18:23 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या स्वाभिमान सभेतून पुतण्या अजित पवार यांचं नाव न घेता टोला लगावलाय.
 
शरद पवार हे कुणाचंही नाव घेता म्हणाले की ,"सत्तेच्या मागं जा, पण ज्यानं तुम्हाला शिकवलं त्याच्या विषयी माणुसकी ठेवा. नाहीतर लोकच तुम्हाला धडा शिकवतील."
 
अशा शब्दात पुतण्या अजित पवार आणि त्यांच्या गटाचा पवार यांनी समाचार घेतला.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वाभिमान सभेचं गुरुवारी बीडमध्ये आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना विरोधक आणि आपल्या पक्षातील बंडखोर गटावर निशाणा साधला.
 
'पक्ष निष्ठेचं उत्तम उदाहरण म्हणजे बीड जिल्हा'
शरद पवार यांनी सभेला संबोधित करताना सुरुवातीलाच पक्ष निष्ठेचा विषय काढला.
 
पवार म्हणाले "बीडमध्ये आल्यानंतर मला जुन्या काळाची आठवण झाली. निष्ठेच्या पाठी उभे राहणारे कार्यकर्ते मला बीड जिल्ह्यात दिसले.
 
त्या काळी आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात काम करत होतो. तेव्हा काही जणांनी वेगळी भूमिका घेतली होती. पण केसरकाकू क्षीरसागर यांनी नेतृत्वाच्या विरोधात जाणार नाही अशी भूमिका घेतली होती.
 
पक्ष निष्ठा दाखवणारा तेव्हा बीड जिल्हा होता. आता केसर काकूंचा नातू आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपली नेतृत्वाविषयीची तीच निष्ठा दाखवलीय."
 
असं म्हणत शरद पवार यांनी संदीप क्षीरसागर यांची पाठ थोपटली.
 
'लोक निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवतील'- पवार
 
शरद पवार गुरुवारच्या सभेत कोणावर टीकास्त्र डागणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना, त्यांनी आपल्या भाषणात पुतण्या अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांचं नाव न घेता टीका केली.
 
शरद पवार यांनी वयोमानामुळं निवृत्त व्हावं असा सल्ला काही जण देत होते. त्यांच्या या व्यक्तव्याचा खरपूस समाचार त्यांनी आपल्या भाषणातून घेतला, शरद पवार यांनी उलटा सवाल केला की "तुम्ही माझं वय झालं म्हणता तर तुम्ही माझं काय बघितलंय."
 
शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार गटाला म्हणाले की, "सत्तेच्या मागं जा, पण ज्यानं तुम्हाला शिकवलं त्याच्या विषयी माणुसकी ठेवा. नाहीतर लोकच तुम्हाला धडा शिकवतील."
 
पवार पुढे म्हणतात की, " लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही भाजप सोबत गेलात. लोक निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवतील."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती