'त्या' मूर्तीवर ‘पीओपी’ची असल्याचे नमूद करणे बंधनकारक

सोमवार, 4 जुलै 2022 (21:31 IST)
यंदा गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे आणि ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीवर ती मूर्ती ‘पीओपी’ची असल्याचे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्तींमुळे समुद्रातील पाण्यात प्रदूषण होते. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन केंद्रीय प्रदूषण मंडळाने पर्यावरणाला घातक अशा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवर बंदी घालणारा कायदा केला आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२३ च्या गणेशोत्सवापासून मुंबईत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्त्यांवर पूर्णतः प्रतिबंध असणार आहे.
 
शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचीच खरेदी – विक्री करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पीओपीच्या मोठ्या मूर्तींचे आकर्षण असलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या उत्साहावर पाणी फिरणार आहे. त्याचप्रमाणे पीओपी मूर्तीं बनविणाऱ्या मूर्तीकारांच्या व्यावसायाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
 
गणेशोत्सव तोंडावर आल्याने हा उत्सव जल्लोषात साजरा करतांना त्यात कोणतीही त्रुटी राहू नये व उत्सवाला गालबोट लागू नये, सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी व पूर्व तयारीसाठी परिमंडळ – २ चे उप आयुक्त हर्षद काळे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या एफ/ दक्षिण कार्यालयात गणेशोत्सवात मंडळे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी आदींची बैठक पार पडली. या बैठकीत पालिकेने वरीलप्रमाणे फर्मान काढले.
 
या बैठकीत, ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी, ‘पी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह मुंबई पोलीस दलाचे अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि महापालिकेच्या सर्व २४ विभागांचे आणि संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
 
परिमंडळ – २ चे उप आयुक्त हर्षद काळे यांनी, पर्यावरण संरक्षणासाठी पुढील वर्षाच्या श्री गणेशोत्सवापासून म्हणजेच सन २०२३ च्या श्री गणेशोत्सवापासून मुंबई महापालिका क्षेत्रात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेश मूर्त्यांवर पूर्णतः प्रतिबंध लागू करण्यात येणार आहे, असे सांगितले. तसेच, शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्या श्री गणेश मूर्तींचीच खरेदी – विक्री करणेही बंधनकारक असणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती