गणेशोत्सवासाठी चाकरमानी ‘वेटिंग’वर!

गुरूवार, 5 मे 2022 (15:14 IST)
खेड: यंदा गणेशोत्सवाची धामधूम 31 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने 28 एप्रिलपासून आरक्षणाची दारे खुली केली. आरक्षण सुरू होताच गणेशोत्सवात धावणाऱया चारही नियमित रेल्वेगाडय़ांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाले. तासन्तास तिकीट खिडक्यांवर उभे राहूनही गणेशभक्तांच्या पदरी निराशाच पडली. या चारही नियमित गाडय़ांचे प्रवासी ‘वेटिंग’वर असून त्यांच्या नजरा आता गणपती स्पेशल गाडय़ांकडे खिळल्या आहेत.
 
गणेशोत्सवात धावणाऱया नियमित गाडय़ांचे आरक्षण खुले करताच आरक्षित तिकिटांसाठी ऑनलाईन व तिकिट खिडक्यांवरही चाकरमान्यांची झुंबड उडाली. मात्र कोकणकन्या, तुतारी, मांडवी, जनशताब्दी एक्सप्रेस या चारही गाडय़ांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाल्याने तास्नतास तिकीट खिडक्यांसमोर उभे राहणाऱया गणेशभक्तांचा हिरमोड झाला. असंख्य प्रवाशांना ‘वेटींग’वर रहावे लागले आहे. चाकरमान्यांना आता ‘गणपती विशेष’ गाडय़ांचा आधार घ्यावा लागणार आहे.
 
सर्वच स्थानकात थांबणारी पॅसेंजर सोडावी
नियमित गाडय़ांना जास्त डबे जोडणे आवश्यक आहे. विशेष गाडय़ा सोडताना संपूर्ण एसी गाडय़ा सर्वप्रथम व त्यानंतर 15 दिवसांनी सामान्य गाडय़ा जाहीर कराव्यात. आरक्षण सुरू करताना तेवढय़ाच दिवसांचा फरक असायला हवा. मुंबई-चिपळूणनंतर मुंबई-रत्नागिरी व शेवटी मुंबई-सावंतवाडी/गोवा/मंगळूरु अशा क्रमाने विशेष गाडय़ा जाहीर कराव्यात व प्रत्येकी 2 ते 4 दिवसाच्या फरकाने आरक्षण सुरू करावे. यामुळे लांबच्या गाडय़ांमध्ये जवळच्या प्रवाशांची गर्दी होणार नाही. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबणारी एखादी पॅसेंजर गाडीही सोडावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती